Pandit Ramdas Kamat Passed Away : ज्येष्ठ गायक, अभिनेते पंडित रामदास कामत यांचं निधन
Pandit Ramdas Kamat Passed Away : मराठी रंगभूमीवरील संगीत नाटकांच्या सुवर्णयुगाचे साक्षीदार असलेले पंडित रामदास कामत यांचं निधन झालं आहे.
Pandit Ramdas Kamat Passed Away : रंगभूमीवरील सुवर्णयुगाचे साक्षीदार आणि ज्येष्ठ गायक, अभिनेते पंडित रामदास कामत यांचं शनिवारी रात्री विलेपार्ले इथल्या त्यांच्या निवासस्थानी वृध्दापकाळानं निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. पंडित रामदास कामत यांनी धि गोवा हिंदू असोसिएशनच्या 'संगीत संशय कल्लोळ' या नाटकाने आपल्या संगीत रंगभूमीवरील कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी अठरा संगीत नाटकांमधून काम केले होते. त्यांच्या पश्चात मुलगा डॉ. कौस्तुभ कामत, सून डॉ. संध्या कामत, नातू अनिकेत, नातसून भव्या असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर अंधेरी येथील पारसीवाडा स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.
मराठी रंगभूमीवरील संगीत नाटकांच्या सुवर्णयुगाचे साक्षीदार असलेले पंडित रामदास कामत हे मूळचे गोव्याचे. लहानपणीपासून वडिल बंधू उपेंद्र यांच्याकडून संगीताचे धडे गिरवणाऱ्या कामत यांनी नाट्यसंगीताचेही शिक्षण घेतले. पंडित गोविंद बुवा अग्नी, पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडित भीमसेन जोशी यांच्याबरोबरच प्रभाकर पेंढारकर आणि भालचंद्र पेंढारकर यांच्या हाताखाली त्यांनी नाट्यसंगीत आणि अभिनयाचे प्रशिक्षण घेतले होते. तर यशवंत देवांकडून त्यांनी भावगीत शिकून घेतले.
'महाराष्ट्र गोमंतकाच्या गळ्याने गातो' हे वचन सार्थ ठरवत ज्यांनी शेवटपर्यंत संगीत नाटकाचा किल्ला लढवला. 'पूर्वेच्या देवा तुझे', ' श्रीरंगा कमला कांता' , 'गुंतता हृदय हे', ' प्रथम तुज पाहता', 'देवा तुझा मी सोनार', 'देवाघरचे ज्ञात कुणाला' अशी एक ना दोन, शेकडो गाणी गाऊन संगीत रंगभूमीसह लोकगीत, भावगीत, चित्रपट गीत अशी संगीत सेवा ज्यांनी केली ते म्हणजे, ज्येष्ठ गायक नट रामदास कामत. सांगितिक कारकिर्दीची 60 वर्षे यशस्वीरीत्या पूर्ण केली, तेही एअर इंडियातील आपली नोकरी सांभाळून ही दुहेरी भूमिका बजावताना त्यांनी यश संपादन केलं. ज्यांनी अनेक वर्षे तरूणाईला वेड लावले, असा नायक आज पडद्याआड गेला. एबीपी माझाकडून पंडित रामदास कामत यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
संगीत नाटक रंगभूमीवर बहरत असताना गोपीनाथ सावकार, मो. ग. रांगणेकर, मास्टर दत्ताराम, भालचंद्र पेंढारकर यांच्यासारख्या दिग्गजांच्या दिग्दर्शनाखाली त्यांनी संगीत नाटक केले. 'धि गोवा हिंदू असोसिएशन', 'गोपीनाथ सावकार कलामंदिर', 'मुंबई मराठी नाट्यसंघ', 'रंगशारदा', 'भरत नाट्यमंदिर', 'मराठी रंगभूमी' ते 'चंद्रलेखा' अशा विविध नाट्यसंस्थांबरोबर ते जोडले गेले होते.
संगीत मत्स्यगंधा हे त्यांचे अत्यंत गाजलेले नाटक असून 'गुंतता ह्रदय हे', 'नको विसरू संकेत मीलनाचा', 'तम निराशेचा सरला' सारखी त्यांची अनेक नाट्यपदे गाजली. त्यांनी गायलेली 'जन विजन झाले', 'अंबरातल्या निळ्या घनांची शपथ तुला आहे', 'श्रीरंगा कमला कांता', 'पूर्वेच्या देवा तुझे', 'देवा तुझा मी सोनार' अशी कितीतरी गाणी आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत.