(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोरोना काळात तापदायक 'हिवसाळा!'
कोरोनाच्या काळातील हा हिवसाळा आरोग्यासाठी तापदायक आहे. यापासून नागरिकांनी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी योग्य त्या उपाय योजना कराव्यात असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
मुंबई : हिवाळ्यात पाऊस पडल्यामुळे वातावरणात अचानक बदल झाला आहे. अगोदरच काही दिवसांपासून राज्यात सर्वच ठिकाणी थंडी पडली असून त्यात काही ठिकाणी पाऊस पडल्यामुळे नागरिकांना सर्दी, खोकला सारख्या व्याधींना सामोरे जावे लागण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी या काळात स्वतःची काळजी घेतली पाहिजे. सोशल मीडियावर या दोन ऋतूंच्या एकत्रितपणामुळे त्यांनी या मोसमाला 'हिवसाळा' असे संबोधल्यामुळे वेगळीच चर्चा निर्माण झाली आहे. मात्र, या कोरोनाच्या काळातील हा 'हिवसाळा' आरोग्यासाठी तापदायक आहे. यापासून नागरिकांनी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी योग्य त्या उपाय योजना कराव्यात असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
दरवर्षीच हिवाळ्यात खोकल्याचे आणि सर्दीचे रुग्ण अधिक संख्येने पाहावयास मिळतात. कारण या काळात हवामानात मोठ्या प्रमाणात बदल झालेला असतो. वातावरण थंड असते या वातावरणाशी एकरूप होण्याकरिता काही काळ जातो. मात्र, या प्रक्रियेत अनेकांना या दरवर्षीच्या येणाऱ्या व्याधींना थोड्या फार प्रमाणात सामोरे जावेच लागते. तसेच या काळात श्वसनास त्रास होण्याच्या व्याधींमध्ये दरवर्षीच रुग्ण दिसत असतात. या वर्षी तर कोरोनाची साथ जोडीला आहे, जो संसर्गजन्य आजार आहे. याकरिता नागरिकांनी दक्ष राहणे गरजेचे आहे. सुरक्षिततेचे सर्व नियम या काळात नागरिकांनी पाळणे गरजेचेच आहे.
या प्रकरणी पुणे येथील श्वसन विकार तज्ज्ञ डॉ. स्वप्नील कुलकर्णी यांनी सांगितले कि, " डिसेंबर महिन्यातील हिवाळा म्हटलं की आपल्याकडे राज्यात बहुतांश ठिकाणी थंड वातावरण असते. हे वातावरण कुठल्याही विषाणूसाठी पोषकच असते. त्यात आज अचानकपणे राज्याच्या काही भागात पाऊस झाला आहे. तर काही भागात दुपारी गरम रात्री अचानक थंड असे वातावरणात विविध बदल दिसून येत आहे. हवामानात ज्यावेळी बदल होतात त्याचा साहजिकच नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. या काळातील हवामानांत नागरिकांना खोकला, सर्दी, पडसे या सारख्या सर्वसाधारण आजारांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
तसेच सध्या कोरोनाची साथही जोरात सुरु आहे. सध्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी असली तरी येणारा काळ कसा असेल याबाबत आताच मत व्यक्त करणे चुकीचे ठरेल. कोरोना विषाणूची तीव्रता कमी होते की जास्त हे पाहणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे विषाणूंमध्ये काही जनुकीय बदल होत आहे का ते पाहणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सगळ्यांनीच या काळात सुरक्षिततेचे नियम पाळणे गरजेचे आहे. तसेच वातावरणानुसार गरम कपडे आणि संतुलित आहार ठेवून व्यायाम करावा."
सध्या कोरोनाच्या आजराचे आधीच्या तुलनेने कमी प्रमाणात का होईना रोज नवीन रुग्ण निर्माण होत आहे तर त्याच किंवा त्याच्या अधिक प्रमाणात रुग्ण उपचार घेऊन बरे होऊन घरी जात आहे. तसेच काही प्रमाणात राज्यात या आजाराने रोज मृत्यू होत आहे. या मोसमात सकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात धुकं आणि धूळ याचं मिश्रण वातावरणात असते. त्यामुळे श्वसनाचे विकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Untimely rain | मुंबईत हिवसाळा! मुंबई, ठाणे, पालघर, नंदुरबारमध्ये अवकाळी पावसाच्या सरी