Uddhav Thackeray in Delhi : विश्वजित कदम खासदार विशाल पाटलांसह थेट दिल्लीत उद्धव ठाकरेंच्या भेटीला! विधानसभेच्या तोंडावर नाराजी दूर होणार?
उद्धव ठाकरे जागावाटपाच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी दिल्लीत आहेत. या भेटीदरम्यानच ते इंडिया आघाडीमधील नेत्यांच्या भेटीगाठी करत आहेत. या भेटीगाठी सुरू असतानाच विश्वजीत कदम आणि विशाल पाटील पोहोचले.
नवी दिल्ली : शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. ते इंडिया आघाडीच्यी नेत्यांची भेट घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. हा संवाद दौरा असल्याचे पक्षाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी सांगितले. उद्धव ठाकरे आप, टीएमसी आणि सपाच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचीही भेट घेणार आहेत. राज्यात ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. राज्यात विधानसभेच्या 288 जागा आहेत. महाराष्ट्रात शिवसेना (UBT), काँग्रेस आणि NCP (SCP) महाविकास आघाडीत (MVA) आहेत. हे तीनही पक्ष इंडिया आघाडीत आहेत. ‘आप’चाही या ब्लॉकमध्ये समावेश आहे. अशा परिस्थितीत उद्धव I.N.D.I.A. ब्लॉकमध्ये समाविष्ट असलेल्या पक्षांच्या नेत्यांशी जागावाटपावर चर्चा करू शकतात, अशी अपेक्षा आहे. या पक्षांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकाही एकत्र लढल्या होत्या आणि आपापसात जागा वाटून घेतल्या होत्या. भाजप-शिवसेना (शिंदे गट) सरकारचा कार्यकाळ नोव्हेंबर 2024 मध्ये संपणार आहे.
विश्वजित कदम खासदार विशाल पाटलांसह थेट दिल्लीत उद्धव ठाकरेंच्या भेटीला!
दरम्यान, लोकसभा निवडणुकीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघावरून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला होता. उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने सांगलीमध्ये उमेदवार दिला होता. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात वाद निर्माण झाला होता. विशाल पाटील यांनी बंडखोरी करत बाजी मारताना भाजप खासदार संजय पाटील यांचा पराभव केला होता. या लढतीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील मात्र तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. त्यामुळे या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर दिल्ली दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या भेटीला विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील पोहोचले. त्यामुळे राजकीय भूवया उंचावल्या.
दिल्लीमध्ये उद्धव ठाकरे जागावाटपाच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी पोहोचले आहेत. मात्र या भेटीदरम्यानच ते इंडिया आघाडीमधील नेत्यांच्या भेटीगाठी करत आहेत. या भेटीगाठी सुरू असतानाच विश्वजीत कदम आणि विशाल पाटील हे सुद्धा भेटीला पोहोचल्याने सांगलीतील लोकसभा जागेवरून निर्माण झालेला तणाव कमी करणार का? याकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांना या भेटी संदर्भात विचारण्यात आला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाराजीचा सूर कमी होणार का? याची सुद्धा चर्चा आहे. सांगलीत ठाकरे गट दोन जागा लढवण्याच्या विचारात आहे. त्यामुळे सुद्धा आजच्या भेटीत चर्चा होऊ शकते.
महाविकास आघाडी विधानसभा निवडणूक एकत्र लढणार
दुसरीकडे, 30 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (एससीपी) प्रमुख शरद पवार म्हणाले होते की, काँग्रेस, शिवसेना (यूटी) आणि त्यांचा पक्ष या वर्षी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या निवडणूक एकत्र लढतील. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत युतीचा भाग असलेल्या छोट्या मित्रपक्षांच्या हिताचे रक्षण करण्याची नैतिक जबाबदारी महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्षांची आहे, असेही पवार म्हणाले होते. राज्यात परिवर्तनाची गरज असून ते घडवून आणण्याची नैतिक जबाबदारी विरोधी आघाडीची आहे. महाभारतात अर्जुनच्या निशाण्यावर माशांचा डोळा होता, त्यामुळे आमची नजर महाराष्ट्रात होणाऱ्या निवडणुकीकडे लागली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत तिन्ही पक्षांना जनतेने चांगला प्रतिसाद दिला आहे. पण या तिन्ही पक्षांप्रमाणेच डावे पक्ष, शेतकरी आणि कामगार पक्ष (पीडब्ल्यूपी) हे देखील युतीचा भाग होते, पण त्यांना लोकसभेच्या जागा देऊ शकलो नाही, असेही ते म्हणाले होते.
इतर महत्वाच्या बातम्या