भिंवडीत पत्रकारावर हल्ला करणाऱ्या तिघांना आठ तासात अटक
भिवंडीतील खंडूपाडा येथे वार्तांकन करत असताना एका टोळक्याने एबीपी माझाचे प्रतिनिधी अनिल वर्मा यांच्यावर हल्ला केला होता. यावेळी हल्लेखोरांनी कॅमेरा आणि बूमही पळवला होता.
भिवंडी : वृत्त संकलित करण्यासाठी गेलेल्या भिवंडीतील पत्रकाराला मारहाण करुन कॅमेरा आणि बूम पळवणाऱ्या तिघांना शांतीनगर पोलिसांनी आठ तासात गजाआड केलं आहे. या हल्ल्याच्या मागे गुटखा माफियांचा हात असल्याचंही समोर आलं आहे. अश्रफ अली मोहम्मद सादिक अन्सारी, मोहम्मद वसीम मुमताज शेख, इरशास अहमद शेख उर्फ दानिश अशी आरोपींची नावं आहेत. आरोपींकडून पोलिसांनी कॅमेरा हस्तगत केला आहे. इतर फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील सर्व पानटपऱ्या 31 मार्चंपर्यत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. भिवंडीतील खंडूपाडा रोडवरील पानटपरीवर पान व गुटखा खाऊन अस्वच्छता पसरवण्याबाबत काय खबरदारी घेता, यासंदर्भात बातमी करण्यासाठी एबीपी वृत्तवाहिनीचे भिवंडीचे प्रतिनिधी अनिल वर्मा गेले होते. त्यावेळी गुटखा खाऊन थुंकणाऱ्या इसमांची कॅमेऱ्यात शूटिंग करत असताना येथील गुटखा माफिया टोळक्याला घेऊन आले. त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात करत प्रतिनिधींना मारहाण करत कॅमेरा आणि बुम घेऊन पळ काढला.
अनिल वर्मा यांनी याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी स्वतः या गुन्ह्याची गंभीर दखल घेत शांतीनगर पोलिसांना कारवाई करण्याबाबत निर्देश दिले. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक करत कलम 394, 427 सह क्रिमिनल अमेडमेन्ट ऍक्ट 7 (1 ) अ प्रमाणे गुन्हा दाखल केला.
आरोपींकडून कॅमेरा हस्तगत करण्यात आला आहे, मात्र एबीपी माझाचा बूम अध्यापही मिळाला नाही. या हल्ल्याच्या मागे भिवंडीतील गुटखा माफियांची टोळी असल्याचं समोर आलं आहे. तसेच हल्ल्यातील आणखी काही आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरु असल्याची माहिती पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली. आरोपींना भिवंडी न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या घटनेचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व भिवंडी शहरातील सर्व पत्रकार संघटनांनी निषेध केला. या गुन्हेगारांविरोधात फौजदारी प्रक्रियेसोबतच पत्रकार संरक्षण कायदा अधिनियमानुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पत्रकारांच्या शिष्टमंडळाने पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांना निवेदन देऊन केली आहे.