Rajya Sabha Election 2026: लहानपणापासून भुकेचे चटके सोसले, संघर्ष केला, दलित समाजाची मुलगी देशाच्या वरिष्ठ सभागृहात जाणार, शिंदे साहेबांनी...; राज्यसभेची उमेदवारी मिळताच ज्योती वाघमारेंची पहिली प्रतिक्रिया
Rajya Sabha Election 2026: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ज्योती वाघमारे यांना राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.

Rajya Sabha Election 2026: महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या (Rajya Sabha Election) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. या निवडणुकीसाठी भाजपने आपले चार उमेदवार आधीच निश्चित केले होते. मात्र एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून (Shiv Sena) आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) राज्यसभेचा उमेदवार कोण असणार, याबाबत शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता कायम होती. अखेरीस शिंदे यांच्या शिवसेनेकडून ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आता राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाल्यानंतर ज्योती वाघमारे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
ज्योती वाघमारे म्हणाल्या की, मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे आभार. मला वाटलं नव्हतं की, कधी हा दिवस येईल. कारण लहानपणापासून भाकरीचा संघर्ष बघितला. लहानपणापासून भुकेचे चटके सोसले. लहानपणापासून संघर्ष केला. त्यानंतर शिवसेना सेनेच्या दसरा मेळाव्यात बोलण्याची संधी मिळाली. तेव्हा वाटलेलं की यापेक्षा मोठा काहीही होऊ शकत नाही. परंतु शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जसं म्हणायचे की, शिवसैनिक हीच तुमची जात आणि तोच तुमचा धर्म. आज कुठल्याही पद्धतीचे आरक्षण नसताना माझ्यासारखी दलित समाजाची मुलगी देशाच्या वरिष्ठ सभागृहात पोहोचते आहे, त्याबद्दल एकनाथ शिंदे यांचे आभार, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
Jyoti Waghmare: मी संधीचं सोनं करेन
ज्योती वाघमारे यांना उमेदवारी दिल्यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत विचारले असता ज्योती वाघमारे म्हणाल्या की, मी खूप साधी मुलगी आहे. मी खूप गरीब मुलगी आहे. मला राजकारण कळत नाही. पण मला विश्वास आहे की, माझे नेते एकनाथ शिंदे यांनी जी संधी मला दिली, त्या संधीचं सोनं मी करेन. ज्येष्ठ नेत्यांचे योगदान पक्षासाठी खूप महत्त्वाचे आहे. आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या निर्णयासोबत सगळे जण थांबतील आणि सगळ्यांना आनंद वाटेल की, कुठलाही वारसा नसलेली, कुठल्याही घराण्याची परंपरा नसलेली देशाच्या वरिष्ठ सभागृहात जाणार, असे त्यांनी यावेळी सांगितले.
आणखी वाचा





















