(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दिवावासिय घेणार मोकळा श्वास; अखेर डम्पिंग हटवला जाणार
Diva Dumping Ground : दिवा येथील डम्पिंग ग्राउंड हटवण्यात येणार असून नव्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात येणार आहे.
Diva Dumping Ground : मागील अनेक वर्षांपासून असणारा दिवा येथील डम्पिंग ग्राऊंड हटवला जाणार आहे. ठाणे महापालिकेने डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवला आहे. कचरा विल्हेवाटीसाठी भंडार्ली येथील जागा महापालिकेने ताब्यात घेतली आहे. जागा ताबा करारनाम्यावर महापौर नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी गुरुवारी स्वाक्षरी केली. त्यामुळे आता दिवावासियांची डम्पिंगच्या त्रासातून मुक्तता होणार आहे. मागील काही वर्षांपासून हा डम्पिंग ग्राऊंड हटवण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत होती.
महापालिकेच्या ताब्यात आलेल्या भंडार्ली येथील जागेवर लवकरच शास्त्रोक्त पद्धतीने घनकचरा विघटन प्रकल्प सुरू होणार असल्याची माहिती महापौर आणि आयुक्तांनी दिली. ठाणे शहरातील दैनंदिन बहुतांश कचरा हा दिवा येथील डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जात होता. कचऱ्याची ही समस्या दिवसेंदिवस उग्र रुप धारण करीत होती. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून कचऱ्याची विल्हेवाट लावता यावी यासाठी महापालिकेला स्वत:ची जागा असावी यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून जागेची पाहणी करण्याचे काम सुरू होते. अखेर मौजे भंडार्ली येथील अंदाजे 10 एकर जागा इतकी खाजगी जागा भाडेतत्वावर महापालिकेने ताब्यात घेतली आहे. या जागा ताबा करारनाम्यावर आज महापौर नरेश म्हस्के आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी स्वाक्षरी केली.
दिवावासियांनी गेल्या अनेक वर्षापासून ठाणे शहराची गैरसोय होवू नये यासाठी ठाणे शहराचा कचरा दिवा येथील डम्पिंग ग्राऊंडवर टाकण्याची परवानगी दिली होती. वाढत्या लोकसंख्येबरोबर शहरातील वाढणारा कचऱ्यामुळे दिवावासियांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत होता. मात्र भंडार्ली येथे जागा उपलब्ध झाल्यामुळे दिवावासियांची डम्पिंग ग्राऊंडच्या समस्येतून मुक्तता होणार असल्याचे सांगत महापौर नरेश म्हस्के यांनी दिव्यातील स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांचे आभार व्यक्त केले. भंडार्ली येथील जागा नागरी वस्तीपासून दूर असल्यामुळे तसेच येथे येणाऱ्या कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने विघटन होणार असल्यामुळे नागरिकांना याचा कोणताही त्रास होणार नाही याची काळजी महापालिका घेणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
पाहा व्हिडिओ: दिव्यातील डपिंग ग्राऊंडचा प्रश्न सुटला, डंपिंग ग्राऊंडसाठी दुसरी जागा ठरली
इतर महत्त्वाच्या बातम्या:
अवघ्या तासाभरात रिक्षात हरवलेले दागिने मिळाले परत, डोंबिवलीतील घटना
फक्त टेलरमार्कवरून खुनाचा 12 तासात उलगडा, कळवा पोलिसांची कामगिरी