अवघ्या तासाभरात रिक्षात हरवलेले दागिने मिळाले परत, डोंबिवलीतील घटना
रिक्षात विसरलेल्या दागिन्यांचा डोंबिवलीतल्या मानपाडा पोलिसांना तासाभरात शोध लावण्यात यश आलंय.

कल्याण - डोंबिवली : रिक्षात विसरलेल्या दागिन्यांचा डोंबिवलीतल्या मानपाडा पोलिसांना तासाभरात शोध लावण्यात यश आलंय. आपल्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न आटोपून शोभा गायकवाड या रिक्षाने घरी परतल्या. त्यानंतर सात तोळ्यांच्या दागिन्यांची बॅग आपण रिक्षात विसरल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी लगेच मानपाडा पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांना रिक्षाचा नंबर सांगितला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तासाभरातच रिक्षाचा शोध घेतला आणि त्या महिलेला दागिने परत मिळवून दिले.
डोंबिवली पूर्वेत दावडी परिसरात राहणाऱ्या शोभा गायकवाड यांच्या मुलीच्या मैत्रिणीचे काल दादर येथे लग्न होते. या लग्नासाठी सर्व कुटुंबीय दादरला गेले होते. लग्न समारंभ आटोपून रात्री नऊ च्या सुमारास गायकवाड कुटुंबीय डोंबिवली रेल्वे स्थानकावर पोहचले. तेथून दावडी येथे घरी जाण्यासाठी रिक्षा पकडली. त्यांना दावडी येथे सोडून रिक्षा चालक तेथून निघून गेला. घरी गेल्यानंतर त्याना 7 तोळे दागिने रिक्षात राहिल्याचे लक्षात आले मात्र तोपर्यंत रिक्षा चालक निघून गेला होता. गायकवाड यांच्याकडे रिक्षाचा नंबर नव्हता त्यांनी तत्काळ मानपाडा पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली.
मानपाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वणवे यांच्या पथकाने तपास सुरू केला. स्टेशन परिसरातील केडीएमसीचे सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले. या सीसीटीव्हीत ती रिक्षा आढळून आली. रिक्षाचा नंबर व त्या पट्टीच्या आधारे अवघ्या तासभरात पोलिसांनी या रिक्षा चालकाचा शोध घेतला. आधी रिक्षा चालकाने मला याबाबत काही माहीत नसल्याचे सांगितले मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने दागिने परत केले. आज पोलिसांनी गायकवाड यांना त्यांचे दागिने परत केले.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
