सोलापुरात कोरोना रुग्णांची संख्या 33 वर पोहोचली, दिवसभरात 3 रुग्णांची वाढ
सोलापुरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 33 वर पोहोचली आहे. आज तीन जणांचे कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत.
सोलापूर : सोलापूरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसतेय. आज बुधवारी दिवसभरात तीन व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे आता सोलापुरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 33 वर पोहोचली आहे. यापैकी तीन जणांचा आधीच मृत्यू झाला असून उर्वरित 30 जणांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज बुधवारी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी दोन रुग्ण भारतरत्न इंदिरानगरमधील आहेत. या परिसरातील एका वृद्ध महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तिच्या संपर्कातील दोघांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर एक रुग्ण नई जिंदगी परिसरातल्या शिवगंगा नगरामधील आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ही माहिती दिली आहे.
9 कंटेंनमेंट झोनमध्ये 122 पथकांमार्फत सर्वेक्षण
सोलापूरात आतापर्यंत 33 रुग्ण आढळले असून ज्या क्षेत्रातील हे रुग्ण आहेत, अशा 9 ठिकाणी कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत. या परिसरात महापालिकेच्या 122 पथकांमार्फत दैनंदिन सर्व्हेक्षण सुरु आहे. आतापर्यंत जवळपास 11 हजार 904 घरांचा सर्व्हेक्षण करण्यात आला आहे. त्यामध्ये साधारण 69 हजार 499 व्यक्तींचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. या व्यक्तींपैकी 41 व्यक्तींमध्ये सौम्य लक्षणे आढळली असून त्यांनी पुढील तपासणी आणि उपचारासाठी शासकीय रुग्णालयाकडे पाठविण्यात आल्याची माहिती मनपा आयुक्त दीपक तावरे यांनी दिली.
सोलापूरात विनाकारण फिरणाऱ्यांची तब्बल 11 हजार वाहने जप्त, संपूर्ण शहरावर ड्रोनद्वारे नजर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर जिल्ह्यात जवळपास 66 ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली असून त्याद्वारे अनधिकृत व्यक्ती आणि वाहनांचे शहर-जिल्ह्यात प्रवेश रोखण्यात आले आहे. सोलापूर पोलीस आयुक्तालयतर्फे आता पर्यंत सुमारे 2000 गुन्हे 4000 व्यक्तींवर दाखल करण्यात आले आहेत. तर ग्रामीण पोलिसातर्फे देखील साधारण 800 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. विनाकारण बाहेर फिरणाऱ्या वाहन चालकांवर ही सोलपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. शहर आणि ग्रामीण पोलिसांनी आतापर्यंत जवळपास 11 हजार 567 वाहने जप्त करण्यात केली आहेत. संचारबंदीच्या काळात ड्रोनद्वारे सर्वत्र नजर ठेवण्यात येत आहे. तरी नागरिकांनी शिस्त पाळावी असे आवाहन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केले आहे.
रेशन दुकानदारांना सावधान, गैरप्रकाराची तक्रार आल्यास थेट पोलिसात गुन्हा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरीब लोकांना अन्नधान्याची अडचण होऊ नये म्हणून शासनाने रेशन दुकानांच्या माध्यमातून अन्नधान्य पुरवठा उपलब्ध करून दिला आहे. मात्र आदेशानुसार अन्नधान्य न देता कमी धान्य दिल्याची तक्रार सोलापुर जिल्ह्यातील काही रेशन दुकानदारांबद्दल करण्यात आली होती. यावर त्वरित कारवाई करत तीन दुकानदारांचे परवाने निलंबित करण्यात आले तर 3 दुकानदारांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे. माढा तालुक्यातील 2 तर बार्शी तालुक्यातील एका रेशन दुकानदाराचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तर शहरातील तीन दुकानदारांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे. दरम्यान आता जर रेशन दुकानदारांविरुद्ध तक्रार आल्यास थेट पोलिसात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. फौजदारी कलम तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि अन्न पुरवठा सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करणार असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले. तसेच जिल्हयात मुबलक प्रमाणात अन्नधान्य साठा तसेच भाजीपाला आणि घरगुती गॅस उपलब्ध असून नागरिकांनी काळजी करू नये असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.