फडणवीस सत्तापिसासू तर राणेंचा इतिहास हा रक्तरंजित; शिवसेना खासदाराची टीका
नारायण राणेंचा इतिहास हा रक्तरंजित आहे. राणेंच्या भावाचे मारेकरी शोधले जातील. या खुनामागे कोण आहे हे सिंधुदुर्गातील जनता जाणत असल्याची टीका विनायक राऊत यांनी केली आहे.
मुंबई : महाविकास आघाडी सरकारला वर्षपूर्ती झाली. त्याचं निमित्त साधत राज्यभरात भाजपच्या प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर टीका केली. रत्नागिरीमध्ये नारायण राणे यांनी देखील पत्रकार परिषद घेत सरकारवर टीका केली होती. हे सरकार गद्दीरीनं आलं असून ते निक्कमं आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून अपयशी ठरले असल्याची टीका नारायण राणे यांनी केली होती. शिवाय, सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणात देखील त्यांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं होतं. त्यानंतर आता नारायण राणे यांच्यावर विनायक राऊत यांनी टीका केली आहे. नारायण राणेंचा इतिहास हा रक्तरंजित आहे. राणेंच्या भावाचे मारेकरी शोधले जातील. या खुनामागे कोण आहे हे सिंधुदुर्गातील जनता जाणत असल्याची टीका राऊत यांनी केली आहे. रत्नागिरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील विनायक राऊत यांनी थेट निशाणा साधला.
'फडणवीस सत्तापिसासू'
महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे पूर्ण करणार. पण, देवेंद्र फडणवीस हे सत्तापिसासू आहेत. त्यांना सध्या केंद्राच्या नेतृत्वानं सत्तेपासून बाहेर ठेवलं आहे. त्यांचा दिल्लीवर स्वारी करण्याचा डाव केंद्रीय नेतृत्वाच्या लक्षात आला म्हणून अशा प्रकारे त्यांना सत्तेपासून लांब ठेवल्याचं यावेळी विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.
'गद्दारीवर राणेंनी बोलू नये'
नारायण राणे यांनी हे सरकार गद्दारीनं आल्याची टीका केली होती. त्यावर देखील राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. नारायण राणे यांनी मिटक्या मारत बसावं. त्यांना सत्ता काही मिळणार नाही. गद्दारीवर नारायण राणे यांनी बोलू नये. बेईमानी आणि गद्दारी म्हणजे राणे असं देखील यावेळी विनायक राऊत म्हणाले. शिवसेना, काँग्रेससोबत राणेंनी काय केलं हे सर्वांना माहित असल्याचं देखील यावेळी राऊत म्हणाले.
नितेश राणेंवर देखील टीका
दरम्यान, यावेळी नितेश राणे यांच्यावर देखील विनायक राऊत यांनी टीका केली. ''नितेश राणे हे जबरदस्त केसमध्ये अडकले आहेत. नवी मुंबईतील एका केसमध्ये ते तुरूंगाच्या दारापर्यत जाऊन आलेत. तो तुरूंगावास टाळावा याकरता राणेंनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच राणेंच्या संपत्तीची ईडी चौकशी करा'' अशी मागणी यावेळी विनायक राऊत यांनी केली आहे.
''ठाकरेंना आव्हान देणं योगींना जमणार नाही''
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मुंबई दौऱ्यावेळी काही बॉलिवूड कलाकार, दिग्दर्शकांशी देखील संवाद साधणार आहेत. यावेळी त्यांना हे ठाकरेंना आव्हान तर नाही ना? असा सवाल विचारला गेला. त्यावेळी बोलताना ''ठाकरेंना आव्हान देणं हे योगी आदित्यनाथ यांना जमणार नाही. शिवाय, मुंबई आणि फिल्म इंडस्ट्रीचं एक वेगळं नातं आहे. त्यामुळे मुंबईचं महत्त्व कमी नसल्याचं विनायक राऊत यांनी म्हटलंय.