Maratha Reservation : मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, 16 जूनपासून आंदोलनाला सुरुवात; संभाजीराजेंचा इशारा
आंदोलन हे निश्चित आहे, आजपर्यंत सहन केलं पण आता मी गप्प बसणार नाही, काय होईल ते होईल असं सांगत संभाजीराजे छत्रपतींनी आंदोलनाची हाक दिली आहे.
रायगड : राजसदरेवरुन बोलतोय, तुम्ही समाजाचा खेळ केला तर आम्ही गप्प बसणार नाही. मी संयमी आहे, आजपर्यंत सहन केलं पण आता गप्प बसणार नाही, काय होईल ते होईल असं सांगत संभाजीराजे छत्रपतींनी मराठा समाजाला आंदोलनाची हाक दिली आहे. येत्या 16 जून पासून राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीपासून मराठा आरक्षण आंदोलनाला सुरुवात होईल असं संभाजीराजे म्हणाले. रायगडवरील शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाल्यावर संभाजीराजेंनी आपली भूमिका मांडली.
दिशा दाखवणं हे आमचं काम आहे, कोणाहाली दिशाहीन करणे हे आमच्या रक्तात नाही असं सांगत संभाजीराजे म्हणाले की, "रायगडावरुन आतापर्यंत नेहमी सामान्यांचे विषय मांडले, कोणताही राजकारणाचा मुद्दा मांडला नाही. ज्या शिवाजी महाराजांनी बहुजनांसाठी स्वराज्य निर्माण केलं, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी पहिल्यांदा आरक्षण दिलं त्यांच्याच राज्यात आज मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी झगडावं लागतंय हे दुर्दैव आहे."
संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, "मी 2007 पासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी महाराष्ट्र पिंजून काढला. माझा लढा हा 70 टक्के गरीब मराठ्यांसाठी आहे. मराठा समाज हा सामाजिक मागास नाही, म्हणून आरक्षण देता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं. त्याचं सर्वांनाच दु:ख झालं. आता कोण चुकले कोण बरोबर याच्यावरुन मागचे सरकार आणि आताचे सरकार यांच्यात वाद सुरु आहे. या वादाशी आम्हाला काही घेणं-देणं नाही, मराठा समाजाला आरक्षण कसं देणार ते सांगा."
काही दिवसांपूर्वी आपण राज्य सरकारला तीन पर्याय दिले होते असं सांगत संभाजीराजे म्हणाले की, "रिव्ह्यू पिटीशन लोकांना दाखवण्यासाठी फाईल करू नका तर फुलप्रुफ असावा हा पहिला पर्याय. दुसरा पर्याय क्युरिटीव्ह पिटीशन हा आहे आणि तिसरा पर्याय घटना कलम 342-A नुसार राज्यपाल यांच्याकडे प्रस्ताव जाईल तो पुढे राष्ट्रपती आणि त्यानंतर संसदेकडे जाईल आणि त्यातून आरक्षण मिळणं शक्य आहे."
या व्यतिरिक्त 9 सप्टेंबर 2020 च्या आधी झालेल्या नियुक्त्या करुन टाका, याला सर्वोच्च न्यायालयाचा काही आक्षेप नाही. राज्याच्या हातात असलेली गोष्ट त्यांना द्यायला काय हरकत आहे. यामुळे जवळपास दोन हजार नियुक्त्या रखडल्या असल्याचं संभाजीराजेंनी सांगितलं.
आरक्षण हा मराठा समाजाचा हक्क आहे आणि मराठा समाजाला न्याय मिळवून दिल्याशिवाय आता गप्प बसणार नाही असं संभाजीराजे म्हणाले. येत्या 16 जूनपासून कोल्हापूरातील राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीपासून आंदोलन सुरु करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
देशातील लोकांना पहिलं स्वातंत्र्य हे शिवरायांनी मिळवून दिलं. त्यामुळे शिवराज्याभिषेक सोहळा हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा करावा अशी मागणी संभाजीराजे छत्रपतींनी केली. रायगड किल्ल्याचं संवर्धन चांगल्या प्रकारे सुरु असल्याचं संभाजीराजे यांनी सांगितलं.
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सुमारे 350 वर्षांनी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त 'सुवर्ण होनांनी' अभिषेक करण्यात आला आहे. यावेळी संभाजीराजे छत्रपतींनी हा आपल्यासाठी आणि राज्यासाठी एक सुवर्ण क्षण असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. शिवरायांचे हे होन देशातील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन त्यांनी शिवभक्तांना केलं.
पहा व्हिडीओ : Maratha Reservation : 16 जूनपासून मराठा समाजाच्या आंदोलनाला सुरुवात : खासदार संभाजीराजे छत्रपती
महत्वाच्या बातम्या :