लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आमदार नितीन देशमुखांच्या कुटूंबियांचीही झाडाझडती! नेमकं प्रकरण काय?
Nitin Deshmukh ACB Inquiry : अमरावती एसीबीकडून बाळापुरचे ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) आमदार नितीन देशमुख यांच्या कुटूंबियांसंदर्भातही वैयक्तिक माहिती गोळा करण्यास सुरूवात झाल्याची माहिती पुढे आली आहे.
Nitin Deshmukh ACB Inquiry : अकोला (Akola News) जिल्ह्यातील बाळापुरचे ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh)यांची नुकतीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्यात आल्याची माहिती पुढे आली होती. हे वृत्त ताजे असतानाच आता अमरावती एसीबीकडून नितीन देशमुख यांच्या कुटूंबियांसंदर्भातही वैयक्तिक माहिती गोळा करण्यास सुरूवात झाल्याची माहिती पुढे आली आहे. अमरावती एसीबीने (Amravati Anti Corruption Bureau) आमदार नितीन देशमुखांच्या दोन्ही मुला-मुलींच्या शाळेतील फीबद्दल शाळेला माहिती मागीतली आहे. आमदार देशमुखांचा मुलगा पृथ्वी आणि मुलगी अकोल्यातील प्रभात किड्स शाळेचे विद्यार्थी आहेत. आमदार देशमुख मुलांची किती फी भरतात? यासंदर्भात शाळेच्या मुख्याध्यापकांकडे ही माहिती मागितली असल्याचे समोर आले आहे.
याआधी अमरावती एसीबीने आमदार देशमुखांबद्दल अकोला जिल्हा परिषदेला माहिती मागितली होती. आमदार देशमुख हे 10 वर्ष अकोला जिल्हा परिषदेचे सदस्य असतांना विकासनिधी आणि भत्यांची माहिती त्यामध्ये मागविण्यात आली होती. तर 17 जानेवारी 2023 रोजी आमदार नितीन देशमुखांना बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी अमरावतीची एसीबी कार्यालयात चौकशीला बोलावले होते. मात्र हेच प्रकरण आता नव्यानं पुढे आल्याने अनेक चर्चेला उधाण आले असून वैयक्तिक माहिती विचारल्याने आमदार देशमुख हे प्रचंड संतप्त झाल्याचेही बघायला मिळाले आहे.
नेमकं प्रकरण काय?
आमदार नितीन देशमुख हे 2009 ते 2019 या काळात अकोला जिल्हा परिषदेचे सदस्य होते. दरम्यानच्या काळात काही गैरप्रकार तर झाला नाही ना, त्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चौकशी करणार आहे. याआधी 'अमरावती एसीबी'ने बेहिशेबी मालमत्ता आरोप प्रकरणी 17 जानेवारी 2023 रोजी अमरावती येथील कार्यालयात आमदार नितीन देशमुख यांची चौकशी केली होती. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण थंड बस्त्यात पडले होते. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर आता परत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आमदार नितीन देशमुख यांच्या संदर्भातली फाईल उघडल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहे.
मी गद्दारांबरोबर गेलो नाही यामुळे चौकशीचा ससेमिरा
मी वेळोवेळी चौकशीत सर्व माहिती दिली आहे. सातत्याने माझ्या बेहिशोबी मालमत्ते बाबत चौकशी केली जात आहे. 2019च्या निवडणुकीत दाखल केलेल्या अर्जात माजी संपूर्ण संपत्तीची स्थिती नमूद आहे. आता ज्यांनी तक्रार केली आहे त्यांनी बेहिशोबी मालमत्ता कुठे आहे, याची माहिती दिली असेल. दोन वर्षानंतर एसीबीच्या लोकांना जाग येत असेल तर यावर मी काय बोलावं. अशा अधिकाऱ्यांचा सत्कार केला पाहिजे. मी वेल सांगितला तर ते बेल लिहितात. माझी बेहिशोबी मालमत्ता कुठे आहे? ती माझ्या ताब्यात द्यावी आणि माझ्यावर कारवाई करावी, असे स्पष्ट मत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी व्यक्त केले आहे.
गद्दारांबरोबर मी गेलो नाही. यामुळे चौकशीचा ससेमिरा माझ्या पाठीशी लावण्यात आला आहे. त्या काळातली ही चौकशी झाली पाहिजे. ती का होत नाही? याचे उत्तर कोणाकडेही नाही. माझी चौकशी बंद रूममध्ये नव्हे, तर सर्वांसमोर खुल्या पद्धतीने झाली पाहिजे. असेही मत नितीन देशमुख यांनी व्यक्त केलं आहे.
हे ही वाचा