अकोल्यातील बाळापूरचा पाणी प्रश्न पेटला, देवेंद्र फडणवीसांच्या निर्णयाविरोधात आमदार नितीन देशमुखांचे आमरण उपोषण
Akola News Update : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार नितीन देशमुख यांच्या मतदारसंघातील 69 खेड्यांच्या पाणीपुपवठा योजनेतील पाणी आरक्षणाला स्थगिती दिल्याचा देशमुख यांचा आरोप आहे.
Akola News Update : अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshumkh) यांनी आजपासून विधानभवनात आमरण उपोषण सुरू केलं आहे. विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आमदार देशमुख यांचे हे उपोषण सुरू आहे. बाळापूर मतदारसंघातील 69 गावांच्या पाणीपुरवठा योजनेसाठी वान धरणातील 3.35 दलघमी पाण्याचं आरक्षण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार देशमुखांनी पाणी प्रश्नावर उपोषणाचं हत्यार उपसलं आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार देशमुख यांच्या मतदारसंघातील 69 खेड्यांच्या पाणीपुरवठा योजनेतील पाणी आरक्षणाला स्थगिती दिल्याचा देशमुख यांचा आरोप आहे. या 69 खेड्यांसाठी तेल्हारा तालुक्यातील वान प्रकल्पातून 3.35 दलघमी पाणी आरक्षित करण्यात आलं होतं. परंतु, 3 मार्चला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका आदेशाद्वारे हे पाणी आरक्षण रद्द केलंय, असा आरोप आमदार देशमुख यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या याच निर्णयाविरोधात आमदार देशमुख यांनी उपोषण सुरु केलं आहे. आमदार देशमुख यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या 69 गावातील हजारो नागरिकांसह शिवसैनिकांनी देखील एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण सुरू केलं आहे.
बाळापूरच्या या पाणीपुरवठा योजनेवरून अकोल्यात तेल्हारा विरूद्ध बाळापूर असा संघर्ष उभा राहिलाय. अकोटचे भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांनी या आरक्षणाला विरोध करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव घेतली होती. तेल्हारा तालुक्यातील नागरिकांनीही या पाणी आरक्षणाला विरोध केला होता.
दरम्यान, नितीन देशमुख यांनी आज सकाळी उपोषणाला सुरूवात केल्यानंतर लगेच महाविकास आघाडीचे नेते तातडीने त्यांची विचारपूस करण्यासाठी उपोषणस्थळी पोहोचले. विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, सुनील प्रभू, वैभव नाईक, रवींद्र वायकर हे सर्व नेते नितीन देशमुख यांच्याभोवती उभे राहिले. या सर्वांनी नितीन देशमुख यांच्याकडून बाळापूर मतदारसंघातील रखडलेल्या पाणी योजनेची माहिती जाणून घेतली. ही सर्व माहिती घेऊन अजित पवार यांनी तातडीने विधानभवनाच्या आवारात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि देवेंद्र फडणवीस यांना बाळापूरमधील योजनेची कागदपत्रे दाखवली आणि नागरिकांच्या समस्या त्यांच्या कानावर घातल्या.
69 खेडी पाणीपुरवठा योजना
योजनेचा एकूण खर्च : 219 कोटी
प्रत्यक्ष योजनेसाठी लागत असलेला खर्च : 192 कोटी
आतापर्यंत खर्च झालेला निधी : 108 कोटी
आतापर्यंत कंत्राटदाराला दिलेले देयक : 92 कोटी
टाकण्यात आलेली पाईपलाईन : 22 किलोमीटर
वान प्रकल्पातील सध्याचं पाणी आरक्षण
सिंचन : 75.573 दलघमी
पिण्यासाठी : 1.403 दलघमी
बाष्पीभवन : 4.4570 दलघमी.