Aaditya Thackeray: एकनाथ शिंदेंच्या बंडावर आदित्य ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट, मातोश्रीवर येऊन त्यांनी...
Aaditya Thackeray: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड का केले, याबाबत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी गौप्यस्फोट केला आहे.
Aaditya Thackeray: शिवसेनेत जवळपास आठ महिन्यांपूर्वी अभूतपूर्व फूट पडली. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड केले. या बंडामुळे मुख्यमंत्रीपदावरून उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हावे लागले. एकनाथ शिंदे यांनी बंड का केले, याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे हे मातोश्रीवर येऊन रडले होते, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
हैदराबाद येथील गितम विद्यापीठाने (Gandhian Institute of Technology and Management - GITAM) आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी हा दावा केला आहे. आदित्य ठाकरे यांना महाराष्ट्रातील राजकारण, पर्यावरण, शिवसेनेबद्दल प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी आदित्य यांनी मनमोकळेपणाने उत्तरे दिली. एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी म्हटले की, एकनाथ शिंदे यांनी तुरुंगाच्या भीतीने बंड केलं आहे. भाजपसोबत गेलो नाहीतर मी तुरुंगात असेन, असे त्यांनी म्हटले.
एकनाथ शिंदे त्यावेळी मातोश्रीवर येऊन रडले होते, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.
आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, शिवसेना सोडून गेलेले 40 आमदार हे स्वत: साठी आणि पैशांसाठी गेले आहेत. केंद्रीय यंत्रणांकडून अटक होणार होती, म्हणून सध्याचे मुख्यमंत्री आमच्या घरी येऊन रडले होते. जर भाजपसोबत गेलो नाही तर ते मला अटक करतील असंही ते म्हणाले होते.
20 जून 2022 रोजी महाराष्ट्रात विधानपरिषदेची निवडणूक झाली, त्याच रात्री शिंदे आणि आमदार सुरतच्या दिशेनं रवाना झाले होते. पहाटेच्या सुमारास एकनाथ शिंदे हे 16 आमदारांसह संपर्काबाहेर असल्याचे लक्षात आले. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. शिवसेनेच्या 40 आमदारांसह 52 आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सूरत आणि तेथून गुवाहाटीला रवाना झाले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. राज्यातील सत्तासंघर्ष प्रकरणातील निकाल येत्या काही दिवसात येण्याची शक्यता आहे.