नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डी साईभक्तांची गर्दी
साईभक्तांच्या होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर शिर्डीनगरीही सज्ज झाली आहे. अनेक ठिकाणाहून पायी आलेल्या पालख्याही शिर्डीत दाखल होत आहेत. देशभरातून आलेल्या साई भक्तांना दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी साई समाधी मंदिर आज रात्रभर उघडं ठेवण्यात येणार आहे.
शिर्डी : सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षांच स्वागत करण्यासाठी साई भक्तांनी दर्शनासाठी शिर्डीत आज अलोट गर्दी केली आहे. वर्षाचं स्वागत साईबाबांच्या आशीर्वादान करण्याच्या उद्देशाने साईभक्त साई दरबारात हजेरी लावतात. दीड ते दोन लाख साईभक्त साईदर्शनासाठी येतील, असा अंदाज साईबाबा संस्थानने व्यक्त केला आहे.
साईभक्तांच्या होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर शिर्डीनगरीही सज्ज झाली आहे. अनेक ठिकाणाहून पायी आलेल्या पालख्याही शिर्डीत दाखल होत आहेत. देशभरातून आलेल्या साई भक्तांना दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी साई समाधी मंदिर आज रात्रभर उघडं ठेवण्यात येणार आहे. साईंची होणारी नित्य शेजारती आणि पहाटेची काकड आरतीही रद्द करण्यात आली आहे.
नवीन वर्ष लागलं की नवीन कॅलेंडर डायरी विकत घेतली जाते. साईबाबा संस्थानने प्रकाशित केलेली डायरी आणि कॅलेंडर विक्रीस उपलब्ध करून देण्यात आले आहे. साईभक्तांनीही हे डायरी आणि कॅलेंडर विकत घेण्यास गर्दी केली आहे. आपल्या मित्र परिवाराला नवीन वर्षाची भेट द्यावी, या हेतूने अनेकजण मोठ्या संख्येनं डायरी व कॅलेंडर विकत घेत आहेत.
नवीन वर्षात नवीन संकल्प करण्यासाठी साईच्या दरबारात लाखो भाविक नतमस्तक होतात. नाताळपासून नवीन वर्ष या काळात शिर्डीत भक्तांचा मळा फुलतो. भक्तांची वाढती गर्दी पाहत वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले असून कोणताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी साई मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तसेच समाधी मंदिरासोबत गुरुस्थान, द्वारकामाई व चावडी याठिकाणीही फुलांची सजावट करण्यात आली.