(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अजित पवार गटाच्या आमदारांविरोधात शरद पवार गट आक्रमक, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांचे उपसभापतींकडे अर्ज
अजित पवार गटाच्या विधानसभेतील आमदारांचा अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांकडे कारवाई सुरू असताना आता विधान परिषद आमदारांच्या कारवाईसाठी देखील अर्ज दाखल करण्यात आले आहे.
मुंबई : अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड केल्यानंतर थेट राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि चिन्हावर दावा केल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) आक्रमक झाले आहेत. एकीकडे अजित पवार गटाच्या विधानसभेतील आमदारांचा अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांकडे कारवाई सुरू असताना आता विधान परिषद आमदारांच्या कारवाईसाठी देखील अर्ज दाखल करण्यात आले आहे.
विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्याकडे आमदार अपात्र करण्यासाठी दोन अर्ज दाखल करण्यात आलेत. एक अर्ज प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभेतील गटनेते जयंत पाटील यांच्या नावे तर दुसरा अर्ज शरद पवार गटाचे सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांच्या नावे करण्यात आला आहे. जयंत पाटील यांनी केलेल्या अर्जात आमदार विक्रम काळे, सतीश चव्हाण, अमोल मिटकरी आणि अनिकेत तटकरे यांच्या नावाचा उल्लेख तर जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या अर्जात रामराजे यांच्या नावाचा उल्लेख आहे.
शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून अपात्र आमदारांविरोधात पाऊल उचलले आहे. गेल्याच आठवड्यात शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात उत्तर दाखल करण्यात आले असून अजित पवार गटाने केलेले सगळे दावे फेटाळले आहेत. एवढच नाही तर मंत्र्यांशिवाय अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या विरोधात सुद्धा अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली आहे. नऊ मंत्र्यांशिवाय 31 आमदारांच्या विरोधातही अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली असून यातले चार विधान परिषद आमदार असल्याची माहिती आहे.
शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीत पक्षाची चिन्हाची लढाई सुरू होणार आहे. निवडणूक आयोगाने अद्याप पक्षातल्या फुटीची केस म्हणून नोंद घेतलेली नाही. अजित पवारांनी 2 जुलैला बंड केल्यानंतर दोन महिन्यानंतर शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला उत्तर दिले आहे. अजित पवार गटाला देखील आजच उत्तर दाखल करायचे आहे. मात्र अद्याप त्या संदर्भात कोणतीही माहिती मिळालेली नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे दरवाजे बंद झालेत'
'जे गेलेत त्यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे दरवाजे बंद झालेत', असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले आहेत. अजित पवारांसोबत (Ajit Pawar) सत्तेत गेलेल्या आमदार, पदाधिकाऱ्यांबाबत बोलतांना शरद पवारांनी हे वक्तव्य केलंय. शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
हे ही वाचा :