Shani Shingnapur: शनिशिंगणापूरात शनिदेव देवस्थानचा मोठा निर्णय, अभिषेक करण्यासाठी आता 5 पुरोहितांची नेमणूक, कधीपासून अंमलबजावणी होणार?
Shani Shingnapur: शनिशिंगणापूर येथील ऑनलाइन पूजा अॅप घोटाळाप्रकरणी गेल्या काही महिन्यांपासून हे देवस्थान चर्चेत आहे.

Shani Shingnapur: अहिल्यानगरच्या शनिशिंगणापूर येथे देवस्थान विश्वस्त मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. शनिशिंगणापूर येथे धार्मिक विधींबाबत पारदर्शकता असावी, यासाठी आता देवस्थान विश्वस्त मंडळाने शनिदेवाचा अभिषेक करण्यासाठी मानधन तत्त्वावर पाच पुरोहितांची नेमणूक केली आहे.
आता पुरोहितांकडून अभिषेक करता येणार
शनिशिंगणापूर येथे भाविकांना देवस्थानकडे शंभर रुपयांची अभिषेक पावती करून पुरोहितांकडून अभिषेक करता येणार आहे. अभिषेकासाठी पुरोहितांना स्वतंत्र दक्षिणा देण्याची आता गरज नाही तसेच देवस्थानसाठी एक हजारांची पावती करणाऱ्या भाविकांना अभिषेकाची शंभर रुपयांची पावती करण्याची गरज नसणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सहा सप्टेंबरपासून करण्यात आली आहे.
देवस्थान चर्चेत
शनिशिंगणापूर येथील ऑनलाइन पूजा अॅप घोटाळाप्रकरणी अहिल्यानगर सायबर पोलिसांकडे चौकशी सुरू असल्याने गेल्या काही महिन्यांपासून हे देवस्थान चर्चेत आहे. ऑनलाईन अँपच्या माध्यमातून पूजा करून घेत मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप झाल्यानंतर देवस्थानने पगारी पुरोहित ठेवण्याचा मोठा निर्णय घेतला. शनी मंदिर हे पहाटे चार वाजल्यापासून ते रात्री साडे दहा वाजेपर्यंत सुरू असते. या कालावधीत पाच पुरोहितांची शिफ्ट नुसार नियुक्ती करण्यात आली आहे.
दररोज हजारोंच्या संख्येने भाविकांची हजेरी
शनिशिंगणापूर येथे शनिदेवाची काळ्या रंगाची स्वयंभू मूर्ती आहे. 5 फूट 9 इंच उंच आणि 1 फूट 6 इंच रुंद असलेली ही मूर्ती संगमरवरी चौथऱ्यावर ठेवली आहे. सूर्यप्रकाश असो, वादळ असो, पाऊस असो किंवा हिवाळा असो, शनिदेवांच्या मूर्तीला काहीही होत नाही. राजकारणी आणि प्रभावशाली वर्गातील लोक येथे नियमितपणे भेट देतात आणि सामान्य भाविक दररोज हजारोंच्या संख्येने देवतेचे दर्शन घेण्यासाठी येथे येतात.
हेही वाचा :
Weekly Horoscope: अखेर सप्टेंबरचा नवा आठवडा सुरू! पितृपक्षाचा काळ 'या' 4 राशींसाठी टेन्शनचा? मेष ते मीन 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य






















