(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बेळगावप्रश्नी उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनी येडीयुरप्पांशी चर्चा करावी : संजय राऊत
सीमाप्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार यांनी कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्याशी चर्चा करायला हवी, असं मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी मांडलं आहे.
बेळगाव : बेळगाव प्रश्नावर दोन्ही राज्यांच्या (महाराष्ट्र आणि कर्नाटक) मुख्यमंत्र्यांनी चर्चेतून तोडगा काढावा, अशी मागणी शिवसेने नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केली आहे. राऊत म्हणाले की, या चर्चेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्याशी चर्चा करावी.
दरम्यान, कर्नाटकात मराठी भाषिकांवर अन्याय होत असल्याचाही पुनरुच्चार राऊत यांनी केला आहे. संजय राऊत सध्या बेळगावमध्ये आहेत. आज बेळगावात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात असल्याने यावर आपण राजकीय भाष्य करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार या तिघांची एक शिखर परिषद व्हायला हवी. दोन्ही राज्यांच्या भूमिका ठरायला हव्यात. तसेच बेळगावातल्या मराठी भाषिकांच्या ज्या मागण्या तातडीने सोडवता येऊ शकतात, त्यासंदर्भात निर्णय घ्यायला हरकत नाही.
दरम्यान, संजय राऊत यांनी यावेळी बेळगाव सीमावादाबाबत राजकीय भाष्य करणे टाळले, राऊत म्हणाले की, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. 14 वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात लटकलं आहे. तारखांवर तारखा पडत आहेत. एखादं प्रकरण न्यायालयात गेल्यावर त्यावर राजकीय भाष्य करता येत नाही. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर राम मंदिर प्रकरणाचा योग्य निकाल लागला, त्याचप्रमाणे बेळगाव सीमाप्रश्नाचाही निकाल लागेल.