ओठास लाली व तोंडास पावडर लावून खिडकीत बसलेल्यांनी खिडकीही बंद करून घ्यावी; शिवसेनेची भाजपवर बोचरी टीका
विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारले की, कांग्रेससोबत आघाडी करण्याचा बाळासाहेबांना शब्द दिला होता का? यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाची पालखी कायम वाहणार नाही, असा शब्द मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिला होता.
मुंबई : नागपूरमध्ये विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर जोरदार हल्ले करत आहेत. याचदरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारले की, कांग्रेससोबत आघाडी करण्याचा बाळासाहेबांना शब्द दिला होता का? यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाची पालखी कायम वाहणार नाही, असा शब्द मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिला होता. दोन्ही पक्ष आणि नेत्यांमधला कलगीतुरा अधिवेशनापुरता मर्यादित राहिलेला नाही. आज शिवसेनेने 'सामना' या मुखपत्राद्वारे भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
'सामना'च्या अग्रलेखामध्ये म्हटले आहे की, शिवसेनेने भाजपचे ओझे फेकून दिल्याची घोषणाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यामुळे ओठास लाली व तोंडास पावडर लावून खिडकीत बसलेल्यांनी खिडकीही बंद करून घ्यावी. तसेच शिवसेनेने भाजपचं स्वतःच्या खांद्यावरीलच नव्हे तर राज्यावर असलेलं ओझं उतरवलं, अशी बोचरी टीका 'सामना'ने केली आहे.
ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे मंगळवारी निधन झाले. त्यानंतर बुधवारी या बातमीचा संदर्भ देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉ. लागू यांच्या 'सामना' या सिनेमाचा उल्लेख केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते, 'सामना' या चित्रपटात एक गाणं आहे, 'कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे', आम्हीही 30 वर्षे ओझं वाहत होतो, ते आता उतरवलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या याच वक्तव्याचा आधार घेत 'सामना'ने भाजपला लक्ष्य केले आहे.
अग्रलेख : ओझे उतरले! (अग्रलेखातील महत्त्वाचा भाग) 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस व त्यांच्या मायबापांनी शब्द पाळला नाही आणि महाराष्ट्रात त्यांच्यावर राजकीय बेकार होण्याची वेळ आली. आता तर शिवसेनेने भाजपचे ओझे फेकून दिल्याची घोषणाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यामुळे ओठास लाली व तोंडास पावडर लावून खिडकीत बसलेल्यांनी खिडकीही बंद करून घ्यावी. शिवसेनेने स्पष्टच केले. आपल्यात आता कोणतेही नाते उरलेले नाही. नात्यांचेही तसे ओझेच होते. तेही उतरले.
भारतीय जनता पक्षाचे 30 वर्षांचे ओझे उतरवले असल्याची शुभवार्ता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे! हा प्रयोग गेली 30 वर्षे चालला होता. आता हे ओझे उतरवल्याची अधिकृत घोषणा नागपूरच्या विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनीच हे जाहीर केल्यामुळे भारतीय जनता पक्षाने खिडकीत बसून ‘शुक शुक’ करणे, शीळ मारून लक्ष वेधून घेणे, दरवाजे उघडे आहेत, आम्ही आजही वाटाघाटीस तयार आहोत, अशी डबडी वाजविणे बंद केले पाहिजे. नागपूरच्या अधिवेशनात काही मंडळींनी टोकाची वक्तव्ये केली. ‘आम्ही फार काळ विरोधी पक्षात बसणार नाही. पुढच्या अधिवेशनात आम्ही पुन्हा सत्तेवर असू’ अशी फेक विधाने करूनही नागपूरच्या थंडीत राजकीय हवा गरम झाली नाही. भाजपचे ओझे फक्त शिवसेनेनेच उतरवले नाही तर भाजपची सत्ता एकदाची गेल्यामुळे महाराष्ट्राच्या मनावरील ओझेही उतरले व हवा मोकळी झाल्याचे वातावरण निर्माण झाले. ओझे व ताण इतका उतरला की, एकनाथ खडसे यांच्यासारखे नेते आता खुलेपणाने बोलू लागले आहेत.
मोकळे वाटू लागले एकनाथ खडसे यांना आता मोकळे वाटू लागले आहे. हल्ली ते एकाच वेळी पवारांना भेटतात व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतात. माझा निर्णय घ्यायला मी मोकळा असल्याचे ते हिंमतीने सांगतात. पंकजा मुंडे यांचीही भूमिका वेगळी नाही. प्रत्येकजण मनावरील ओझे फेकून देत आहे व मोकळा श्वास घेत आहे. काँग्रेसच्या मदतीने शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचे वचन आपण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिले होते का? असा प्रश्न विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. फडणवीस यांच्या मानगुटीवर अद्याप सत्तेचे भूत स्वार झाले आहे. त्यामुळे त्यांचे मन मोकळे व्हायला वेळ लागेल. भाजप हे एक ओझे होते व राज्यातील तीन प्रमुख पक्षांनी एकत्र येऊन भाजपचे ओझे उतरवले व त्याचे देशभरात स्वागत होत आहे. काँग्रेस पक्षातून टनावारी माणसे फोडून आपल्या पक्षात घ्यायची व सत्ता मिळवायची हे ज्यांना चालते त्यांनी शिवसेनेने काँग्रेसच्या मदतीने मुख्यमंत्री पद मिळवले वगैरे अशी विधाने करण्याच्या भानगडीत पडू नये.
भारतीय जनता पक्ष म्हणजे 'भारत जलाओ पार्टी' असल्याची बोंब ज्यांनी ठोकली ते रामविलास पासवान मोदी यांच्या मंत्रीमंडळात आहेत व मोदी यांना खालच्या शब्दांत जोडे मारणारे नितीशकुमार हे बिहारात भाजपच्या टेकूवर मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे कोणी कोणावर बोलायचे? भारतीय जनता पक्षाचेच नेते देशाच्या प्रश्नांवर, जनतेच्या मागण्यांवर मूग गिळून बसले आहेत. पण भावनिक विषयांवर तोंड फाटेपर्यंत बोलत आहेत.
महाराष्ट्रात भाजपने शिवसेनेस दगा दिला व हे दगानाटय़ ठरल्याप्रमाणेच झाले. 2014 मध्ये खडसे यांनी युती तुटल्याची घोषणा मोठय़ा गर्वात केली. आज खडसे इतरांच्या पायऱया झिजवत आहेत. 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस व त्यांच्या मायबापांनी शब्द पाळला नाही आणि महाराष्ट्रात त्यांच्यावर राजकीय बेकार होण्याची वेळ आली. आता तर शिवसेनेने भाजपचे ओझे फेकून दिल्याची घोषणाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यामुळे ओठास लाली व तोंडास पावडर लावून खिडकीत बसलेल्यांनी खिडकीही बंद करून घ्यावी. शिवसेनेने स्पष्टच केले. आपल्यात आता कोणतेही नाते उरलेले नाही. नात्यांचेही तसे ओझेच होते. तेही उतरले.