रत्नागिरी जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी, आतापर्यंत 375 मिमी पावसाची नोंद
रत्नागिरी जिल्ह्यात पडत असलेल्या समाधानकारक पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. पावसामुळे सध्या रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या 65 धरणांपैकी 34 धरणं 100 टक्के भरली आहेत.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात सर्वदूर पावसानं हजेरी लावली आहे. कालपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत असल्यानं नद्यांच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे. शिवाय शेतीच्या कामांना देखील वेग आला आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर दिसून येत आहे. जिल्ह्यात मागील 24 तासाचा विचार करता 41 मिलीमीटर पेक्षा देखील जास्त पाऊस झाला असून आतापर्यंत जिल्ह्यात 375 मिलीमीटर पेक्षा देखील जास्त पाऊस झाला आहे.
सध्या जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात पडत असलेल्या समाधानकारक पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. पावसामुळे सध्या रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या 65 धरणांपैकी 34 धरणं 100 टक्के भरली आहेत. तर 2 धरणं 90 टक्के पेक्षा जास्त भरली आहेत. यामध्ये मंडणगड तालुक्यातील 2, दापोलीतील 5, खेड मधील 4, चिपळूणमधील 7, गुहागरमधील 1, संगमेश्वरमधील 5, रत्नागिरीतील 1, लांजा तालुक्यातील 5, राजापूरमधील 4 अशी जिल्ह्यातील 34 धरणं 100 टक्के भरली आहेत. त्यामुळे आता जिल्हावासियांचा पाण्याचा प्रश्न देखील मिटणार आहे. शिवाय, असाच पाऊस सुरू राहिल्यास पुढील काही दिवसांमध्ये उर्वरित धरणं देखील 100 टक्के भरतील.
Monsoon In Maharshtra | तळकोकणात पावसाचा जोर वाढला; मालवण, देवगड, सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस