एक्स्प्लोर
स्वाभिमानी शेतकरी संघटना एनडीएतून बाहेर, राजू शेट्टींची घोषणा
स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आज एनडीएतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुण्यात झालेल्या बैठकीनंतर खा. राजू शेट्टी यांनी याबाबतची घोषणा केली.
पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आज एनडीएतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुण्यात झालेल्या बैठकीनंतर खा. राजू शेट्टी यांनी याबाबतची घोषणा केली. या घोषणेनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि वस्त्रोद्योग मंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर 4 सप्टेंबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत.
एनडीएतून बाहेर पडण्याची घोषणा केल्यानंतर खा. राजू शेट्टींनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल चढवला. मोदींनी आम्हाला हमीभावाच आश्वासन दिलं होतं, पण ते पाळलं नसल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी यावेळी केला.
तसेच स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचा उल्लेख करुन राजू शेट्टी पुढे म्हणाले की, ''व्यवस्थेविरोधात लढताना ताकद कमी पडत होती, त्यामुळे भाकरी बदलणं गरजेचं होतं. म्हणून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या मध्यस्थीने एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अनेकांची टीकाही सहन करुन तीन वर्ष थांबलो. पण सत्तेचा आमच्या आंदोलनाला काहीही फायदा मिळाला नाही. आमच्या वरच्या साध्या केसेस मागे घेतल्या नाहीत.''
विशेष म्हणजे, सदाभाऊ खोत यांच्यावरुन खा. शेट्टी यांनी यावेळी राज्य सरकारवर निशाणा साधला. ''ज्याला आम्ही सत्तेत पाठवलं, तो आम्हाला आमचा म्हणतच नाही,'' अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.
तसेच शेतकऱ्यांचं आंदोलन आता दिल्लीत नेणार असल्याचं सांगून, राजू शेट्टी पुढे म्हणाले की, ''संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 10 लाख शेतकऱ्यांचा मोर्चा जतंरमंतरवर काढणार आहोत.''
दरम्यान, सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी केल्यानंतर खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं होतं. या पत्रामध्ये स्वभिमानी शेतकरी संघटनेचं सत्तेतील स्थान काय, याबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी शेट्टींनी पत्राद्वारे केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी शेट्टींच्या पत्राला अद्याप उत्तर दिले नाही.
त्यातच शेतकरी कर्जमाफी, हमीभाव, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी आदी मुद्द्यांवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं सरकारसोबत मतभेद वाढले होते. शिवाय, राजू शेट्टींनी पुणे ते मुंबई आत्मक्लेश यात्रा काढत सरकारला शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत जाब विचारला होता. पण त्यावर राज्य सरकारकडून समाधानकारक प्रतिसाद मिळाला नसल्याने, खासदार राजू शेट्टी सत्तेत सहभागी असूनही कमालीचे नाराज होते. त्यामुळेच राजू शेट्टी यांनी सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
संबंधित बातम्या
राजू शेट्टी सत्तेतून बाहेर पडणार, उद्या अधिकृत घोषणा : सूत्र
राम सत्यवचनी, मग भक्त नरेंद्र मोदी असत्यवचनी कसे? : राजू शेट्टी
राजू शेट्टी हे स्वयंभू नेते, सदाभाऊंची जळजळीत टीका
VIDEO : औरंगाबाद : सत्तेतून बाहेर पडण्याची फक्त औपचारिकता बाकी : राजू शेट्टी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement