दूध आंदोलनात राज्य सरकार दोषी- राज ठाकरे
राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन दूध आंदोलनावर आपली भूमिका मांडली आहे. राज्यभर सुरु असलेल्या दूध आंदोलनाल राज्य सरकार जबाबदार आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन दूध आंदोलनासह विविध विषायांवर आपली भूमिका मांडली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्यभर सुरु असलेल्या दूध आंदोलनाला राज्य सरकार जबाबदार आहे. सरकारला दूध आंदोलनाची पूर्वकल्पना असताना आंदोलकांशी आधीच चर्चा करायला हवी होती, असं प्रश्न राज ठाकरे सांगितले.
"राज्यात पुरेसं दूध उपलब्ध असताना बाहेरच्या राज्यांमधील अमुल वगैरे दूध उत्पादकांना महाराष्ट्रात घुसवणे सुरुच आहे. महाराष्ट्र सरकारचा कारभार केंद्र सरकारकडून चालवला जात आहे", असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला.
ख़ड्ड्याविरोधात आंदोलन करायचं नाही का? मनसेने सुरु केलेल्या खड्ड्यांविरुद्धच्या आंदोलनावरुन राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर तोफ डागली. "आंदोलनकर्त्या मनसेच्या कार्यकर्त्यांना अटक करून थर्ड डिग्री दिली जात आहे. रस्त्यावर खड्डे जे पडले, त्याला सरकार जबाबदार आणि आम्ही आंदोलन केलं तर आम्हाला मारहाण करणार?", असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
"खड्डयांमध्ये पडून लोकं जखमी होत आहेत, जीव गमावत आहेत, आणि याविरोधात आम्ही आंदोलन करायचं नाही का?" अस सवाल उपस्थित करत मनसेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांविरोधात केसेस टाकणार असल्याचंही राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.