(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'त्यांच्या घरी पोर होईल का नाही हे मी का सांगू?', राज ठाकरेंचा टोला अन् हशा
राज ठाकरे यांच्या मिश्किल टिप्पणीवरून पत्रकारपरिषदेत एकच हशा पिकला. राज ठाकरे यांनी यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरही आपली भूमिका मांडली.
नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावरआहेत. तेथे त्यांनी पत्रकार परिषद घेत एसटी कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवरही टीका केली. याच दरम्यान त्यांना, 'आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येणार काय?' असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना राज ठाकरे यांनी मिश्किल टिप्पणी केली. राज ठाकरे यांनी दिलेलं उत्तर ऐकून पत्रकारपरिषदेत एकच हशा पिकला.
राज ठाकरे यांनी पत्रकारपरिषदेत विविध मुद्यांवर आपली बाजू मांडली. यावेळी त्यांना 'आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येतील काय?' असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी राज ठाकरे यांनी, 'ते मला काय माहित, तो प्रश्न त्यांना विचारा, त्याचं उत्तर मी कसं देऊ शकतो. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ साहित्य संमेलनासाठी नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी त्यांना का हा प्रश्न विचाला नाही. त्यांच्या पक्षाच्या प्रश्नाचं उत्तर मी कसं देऊ?" असे म्हणत, त्यांच्या घरी पोर होईल का नाही हे मी का सांगू?' असा प्रतिप्रश्न राज ठाकरे यांनी यावेळी केला.
राज ठाकरे यांच्या या मिश्किल टिप्पणीवरून पत्रकारपरिषदेत एकच हशा पिकला. राज ठाकरे यांनी यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरही आपली भूमिका मांडली. "एसटी महामंडळातील भ्रष्टाचार बंद होत नाही तोपर्यंत हा प्रश्न मिटणार नाही. त्यामुळे एसटीचं खासगीकरण करण्यापेक्षा एसटी एखाद्या चांगल्या कंपनीकडे चालवायला का देत नाहीत? असा प्रश्न उपस्थित करत राज ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना समजून घेतले पाहिजे असे मत यावेळी व्यक्त केले.
राज्य सरकारवर टीका
"तुमच्या हातात लोकांसाठी राज्य दिलं आहे. आरेरावीची भाषा करण्यासाठी नाही." असा टोला लगावत राज ठाकरे यांनी यावेळी राज्य सरकारवर सडकून टीका केली.
संबंधित बातम्या
ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांना समजून घेणं गरजेचं : राज ठाकरे
Unseen Photos : नववधू कतरिनाचा 'महाराणी' साज; शाही विवाहसोहळ्याचे नवे फोटो चर्चेत