Pradeep Kurulkar : पॉलिग्राफ टेस्ट ते नाशिक कनेक्शन, कुरुलकर हनी ट्रॅप प्रकरणाचं लेटेस्ट अपडेट काय?
हनी ट्रॅपमधे अडकून पाकिस्तानला संवेदनशील माहिती दिल्याचा आरोप असलेले डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर यांच्या मोबाईलमधे नाशिकमधील दोन व्यक्तींची माहिती आढळली आहे.
Pradip Kurulkar : हनी ट्रॅपमधे अडकून पाकिस्तानला संवेदनशील माहिती दिल्याचा आरोप असलेले डीआरडीओचे (DRDO) संचालक प्रदीप कुरुलकर (Pradeep Kurulkar) यांच्या मोबाईलमध्ये नाशिकमधील (Nashik) दोन व्यक्तींची माहिती आढळली आहे. त्यामुळे आता या दोन नंबरची देखील कसून चौकशी करण्यात येणार आहे. नाशिकमधील एटीएस पथकाला तशा सूचना देण्यात आल्या आहेत.
या प्रकरणात आतापर्यंत कुरुलकरांशी संबंधित अनेकांची चौकशी करुन जबाब नोंदवण्यात आले आहेत. ज्यामधे कुरुलकर यांच्यासह काम करणाऱ्या डीआरडीओमधील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसेच गरज पडल्यास कुरुलकर यांची पॉलिग्राफ टेस्ट देखील करण्यात येईल, असं एटीएसने न्यायालयात सांगितलं आहे.
कुरुलकरांचे नाशिक कनेक्शन
पुणे एटीएस पथकाला प्रदीप कुरुलकर यांचे नाशिक कनेक्शन दिसून आलं आहे. एटीएसने तपास सुरु केला आहे. नाशिकमधील ते दोन मोबाईल नंबर कोण वापरत होते? याचा तपास सुरु झाला आहे. यामुळे कुरुलकर प्रकरणात नाशिक कनेक्शन उघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कुरुलकरांची पॉलिग्राफ टेस्ट होणार?
भारतीय संरक्षण क्षेत्रातील संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांसोबत शेअर करणारे DRDO चे संचालक प्रदीप कुरुलकर यांची पॉलिग्राफ टेस्ट करण्याची मागणी महाराष्ट्र एटीएसकडून केली जात आहे. महाराष्ट्र एटीएसने अर्ज दाखल करुन ही मागणी केली आहे. कुरुलकर यांनी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांना कोणती माहिती दिली आहे आणि त्यांच्या कोण कोण संपर्कात होतं? त्यासोबतच पैशांची देवाणघेवाण झाली होती का?, यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तर पॉलिग्राफ टेस्टमध्ये मिळणार, अशी आशा एटीएसला आहे. त्यामुळे आता या चौकशीतून त्यांच्यासंदर्भात नेमकी कोणती माहिती समोर येते आणि त्याअनुषंगाने त्यांच्यावर कोणती कारवाई केली जाते हे पाहणं महत्वाचं आहे मात्र आता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
यासोबतच त्यांच्या नातेवाईकांचीदेखील चौकशी करा, अशी मागणी हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केली आहे. प्रदीप कुरुलकर खरंच दोषी असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला हवी. फक्त त्यांच्यावरच नाही तर त्यांच्या नातेवाईकांवर सुद्धा ज्यांना आपण स्लीपर सेल म्हणू शकतो, त्यांना माहिती होतं की, आपल्या घरातला कर्ता पुरुष काय उद्योग करतोय, येणारे पैसे कसे येत आहेत हे माहिती असूनही त्यांना सहकार्य केलं. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनाही शिक्षा व्हायला पाहिजे. त्यांच्या सुद्धा मालमत्ता जप्त व्हायला पाहिजेत, असं ते म्हणाले आहेत.