(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'मंदिरं खुली होणार, आठ दिवसात नियमावली, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन' : प्रकाश आंबेडकर
प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसह पंढरपुरात आंदोलन केलं. विठ्ठलाचे दर्शन घेऊन आल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला.
पंढरपूर : लवकरात लवकर लोकांसाठी मंदिर, मशीद, बुध्दविहार, जैन मंदिर सुरु केली जातील. त्यासाठी सरकार नियमावली तयार केली जात आहे, अशी माहिती मला मुख्यमंत्र्यांकडून मिळाली. आठ ते दहा दिवसात ही नियमावली तयार होईल आणि मंदिरं सुरु होतील, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. मंदिरं खुली करण्यासाठी आज विश्व वारकरी सेवा आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्त्यांनी पंढरपुरात आंदोलन अखेर संपलं. विठ्ठलाचे दर्शन घेऊन आल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. आंबेडकर आणि शिष्टमंडळाने दरवाज्यातून विठ्ठल-रुक्मिणीचे मुखदर्शन घेतले.
ते म्हणाले की, मी दर्शन घेतलं. 15 जणांच्या शिष्टमंडळाला दर्शन देण्यात आलं. मंंदिरं खुली करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी चांगला निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. आपण आठ दिवस थांबू, वारकऱ्यांच्या आंदोलनाला यश आलं असं आपण समजुया, असं आंबेडकर म्हणाले. लोकभावनेचा आदर केला त्याबद्दल सरकारचे आभार, असंही ते म्हणाले.
पंढरपुरात वंचितचे कार्यकर्ते आक्रमक, प्रकाश आंबेडकर म्हणाले, 'आम्ही नियम मोडण्यासाठीच आलोय'
10 दिवसात आदेश आले नाही तर पुन्हा पंढरपुरात मी म्हणालो तुम्ही घोषणा करा, अन्यथा लोक मला मारतील. मात्र आम्ही करणारच, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला. जे निर्णय शासनाने घेतले पाहिजे, ते सर्वसामान्य लोक घेत आहेत. दुर्दैवाने लोक हा निर्णय घेत आहेत आणि सरकारला तुम्ही हा निर्णय घ्या असे सांगत आहेत. 10 दिवसात आदेश आले नाही तर पुन्हा पंढरपुरात येणार असं देखील आंबेडकर म्हणाले. आम्ही रस्त्यावर लढणारी माणसं आहोत, पुन्हा या प्रश्नांवर आम्हाला लढायला लावू नका असंही ते म्हणाले. इथले जिल्हाधिकारी, पोलिस कार्यालय यांनी जी भूमिका घेतली त्याबाबद्दल मी जाहीर अभिनंदन करतो. आपलं आंदोलन या ठिकाणी थांबवतोय. ज्या शांतपणे आपण सहकार्य केले, त्याच पद्धतीने तुम्ही गावाला जा. 10 दिवसांनंतर पुन्हा यावं लागलं तर तयारी ठेवा, असंही ते म्हणाले.
आम्ही नियम मोडण्यासाठीच इथं आलोय
आम्ही नियम मोडण्यासाठीच इथं आलोय. मंदिरं खुली करण्यासाठी ही गर्दी झाली आहे. मंदिरं खुली करावी या लोकांच्या भावना आहेत. लोकं एकत्रित जमली तरी प्रादुर्भाव वाढत नाही, हे आम्हाला सरकारला दाखवायचं आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी दर्शन घेण्यासाठी म्हटलं होतं. कोणतीही कारवाई करा आम्ही आंदोलन करणारच, असं आंबेडकर यावेळी म्हणाले.
सरकार जर निर्णय घेत नसेल तर जनतेने निर्णय घ्यायचा असतो.सरकारने सुरुवातीलाच वारकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या असत्या तर आंदोलनाची वेळ आली नसती. संजय राऊत यांनी आजच्या आंदोलनावर केलेलं वक्तव्य म्हणजे त्यांचा अभ्यास पूर्ण नाहीये. लोकशाहीत सरकारने कृती केली नाही की,जनता ती करते, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
सकाळी विठ्ठल मंदिर परिसरात वंचितच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. तसेच या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळालं, यावर विचारलं असता प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आम्ही फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे, मात्र कार्यकर्ते ऐकायला तयार नाहीत, असं ते म्हणाले.
ते म्हणाले की, मागच्या वर्षी जितकी लोकं पंढरपुरात मृत्यूमुखी पडली त्यापेक्षा कमी लोकं यंदा मृत झाली आहेत, त्यामुळं कोरोनाची भीती दाखवू नका, असंही त्यांनी सूचित केलं.
यावेळी आंबेडकर यांनी एकमेकांमध्ये अंतर ठेवण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलं. बॅरिकेट्स तोडू नका. प्रशासनाला सहकार्य करा, एकमेकांना चिटकून उभे राहू नका, असं आंबेडकर म्हणाले. यावेळी वंचितचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी पोलिसांचं बॅरिकेट्स तोडण्याचा प्रयत्न केला.