PM Modi Pune Visit: मोदींच्या दौऱ्यामुळे पुण्यातील वाहतुकीत उद्या मोठे बदल; सकाळपासूनच 'हे' रस्ते राहणार बंद
PM Modi Pune Visit: उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचं उद्घाटन पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत.
PM Modi Pune Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, म्हणजेच 1 ऑगस्ट 2023 रोजी पुणे दौऱ्यावर (PM Modi Pune Visit) येत आहेत. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने पंतप्रधानांना सन्मानित करण्यात येणार आहे. पंतप्रधानांच्या हस्ते उद्या विविध विकासकामांचं उद्घाटन देखील पार पडणार आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात हे कार्यक्रम पार पडणार असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. सकाळी सहा ते दुपारी तीनवाजेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात काही रस्ते बंद राहणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त उद्या सकाळी सहा वाजल्यापासून पुणे शहराच्या मध्यभागात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
'या' मार्गांवरील वाहतुकीत बदल
पुणे विद्यापीठ चौक, सिमला ऑफिस चौक, संचेती चौक, स. गो. बर्वे चौक, गाडगीळ पुतळा चौक, बुधवार चौक, सेवासदन चौक, अलका चौक, टिळक रोड, जेधे चौक, फर्ग्युसन कॉलेज रोड, संगमवाडी रोड, सादलबाबा चौक, गोल्फ क्लब चौक, विमानतळ रोड इत्यादी ठिकाणांवरील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. वाहनचालकांनी गैरसोय होऊ नये, यासाठी या मार्गांचा वापर टाळून अन्य पर्यायी मार्गांचा वापर करावा, असं आवाहन वाहतूक शाखेतर्फे करण्यात आलं आहे.
सारसबागेकडे जाणारा मार्ग खुला
टिळक रस्त्याने एस. पी. कॉलेज चौकात आल्यानंतर ना. सी. फडके चौकाकडे जाण्यासाठी (एस. पी. कॉलेज चौकातून) उजवीकडे जाणारा मार्ग खुला करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना या मार्गाचा वापर करता येणार आहे.
जेधे चौकातून सारसबागेकडे जाण्यास प्रवेश बंद
जेधे चौकातून सारसबागेकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात आला आहे. सिंहगड रस्त्यावर जाण्यासाठी जेधे चौकातून सातारा रोड, मित्रमंडळ चौक, सावरकर चौक मार्गे सिंहगड रस्ता या मार्गाचा वापर करण्याचं अवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आलं आहे.
सिंहगड रस्त्यावरून स्वारगेटला जाण्यासाठी सावरकर चौक, मित्रमंडळ चौक, व्होल्गा चौक, जेधे चौक या मार्गाचा वापर करण्याचं अवाहन करण्यात आलं आहे. जेधे चौकातील फ्लायओव्हरवरून सारसबागेकडे जाण्यास प्रवाशांना बंदी घालण्यात आली आहे.
— पुणे शहर वाहतूक पोलीस (@PuneCityTraffic) July 29, 2023
पंतप्रधान मोदींना देण्यात येणार लोकमान्य टिळक पुरस्कार
पंतप्रधान मोदी उद्या सकाळी पुणे शहरात येणार आहेत, त्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात मोदी दर्शन घेतील. त्यानंतर स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. शरद पवार या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :