(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गवंड्याचा मुलगा झाला तहसीलदार! पारनेर तालुक्यातील अळकुटीचा सुपूत्र
आज जाहीर झालेल्या MPSC च्या परिक्षेत पारनेर तालुक्यातील अळकुटीचा सुपुत्राची तहसीलदार पदी निवड झाली आहे. तुषार सध्या कर व प्रशासकीय अधिकारी म्हणून चंद्रपूर नगरपरिषद मूल येथे कार्यरत आहेत.
अहमदनगर : आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 13 ते 15 जुलै 2019 दरम्यान घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत पारनेर तालुक्यातील अळकुटी म्हस्केवाडी रोड बहिरोबावाडी येथील तुषार निवृत्ती शिंदे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमधून तहसीलदार पदी निवड झाली आहे. सध्या ते कर व प्रशासकीय अधिकारी म्हणून चंद्रपूर नगरपरिषद मूल येथे कार्यरत आहेत. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असताना तुषार यांनी मिळवलेल्या यशाने कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
तुषार यांच्या वडिलांचा छोटा बांधकाम व्यवसाय आहे. त्यातुनच मंदिर कामांच्या कौशल्यातुन त्यांनी तुषार यांचे श्री साईनाथ हायस्कूल अळकुटी शिक्षण पुर्ण केले. तुषारमधील असणारी हुशारी पाहाता अनेक परीक्षा पास करत ते संध्या. चंद्रपुर याठिकाणी नगरपरिषद मूल येथे कर व प्रशासकीय आधिकरी म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीतपणे यश मिळवत ते तहसीलदार पदाचे मानकरी ठरले आहेत. अभ्यास करताना अनेक अडचणी आल्या. मात्र, त्यांनी कधी जिद्दी सोडली नाही. आज ते तहसीलदार झाले यांचा आम्हाला व पुर्ण अळकुटीकरानां अभिमान वाटतोय, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे.
तुषार यांचा अल्प परिचय
- 2012 मध्ये नॅशनल इन्सिट्युट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च (NIPER), मोहाली येथून एम फार्म.
- 2013 ते 2014 अध्यापनाचे कार्य
- 2014 ते 2019 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा अभ्यास.
सातारचा प्रसाद चौगुले राज्यात प्रथम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 13 ते 15 जुलै 2019 दरम्यान घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत सातारा जिल्ह्यातील प्रसाद चौगुले हा राज्यात पहिला तर उस्मानाबादचा रवींद्र शेळके हा मागासवर्गवारीत प्रथम तर अमरावतीची पर्वणी पाटील महिला वर्गवारीत राज्यात प्रथम क्रमांकावर उत्तीर्ण झाली आहे. एपीएससीच्या मुख्य परीक्षेसाठी राज्यातील एकूण 6825 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यामधून 1326 विद्यार्थी मुलाखतीसाठी निवडण्यात आले आहेत. जवळपास वर्षभराने आज या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात 420 जणांची अधिकारी म्हणून निवड करण्यात येणार आहे.
MPSC Results | राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, सातारचा प्रसाद चौगुले अव्वल!