ओबीसीच्या प्रश्नावर राज्यातील 50 तालुक्यात सभा, बैठका घेणार; वेळप्रसंगी आझाद मैदानावरही दाखल होऊ : लक्ष्मण हाके
ओबीसीच्या प्रश्नावर राज्यातील 50 तालुक्यात सभा आणि बैठका घेतल्या जाणार आहेत. तर वेळप्रसंगी ओबीसीची एकजूट करून ओबीसी समाज आझाद मैदानावर दाखल होईल, असा इशारा ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी दिलाय.
ओबीसीचे आरक्षण संपवणाऱ्याला तुम्ही निवडून देणार आहात का?
राज्यात मराठा- ओबीसी आरक्षणाचा प्रश्न तापलेला असताना आगामी विधानसभेसाठी ओबीसी कोणाला मतदान करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केल्याचं दिसलंय. 288 आमदारांनी एक कार्ड तयार करून ओबीसी समाज बांधवांच्या प्रश्नावर किती बोललात? हे सांगावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. आज मनोज जरांगे पाटील यांना सर्व आजी-माजी आमदार, खासदार पाठिंबा देत आहेत. तर तुम्ही कोणाचे 288 आमदार पाडणार आहात? असा सवाल हाके यांनी यावेळी उपस्थित केला.
ओबीसीचे आरक्षण संपवणाऱ्याला तुम्ही निवडून देणार आहात का? असे देखील यावेळी हाके यांनी म्हटले आहे. लक्ष्मण हाके यांनी बीडच्या आष्टी तालुक्यातील हातोला गावात आयोजित एका सप्ताहास भेट दिली आहे. यादरम्यान त्यांनी भाजप, काँग्रेस आणि मनोज जरांगे पाटील यांना लक्ष केले आहे.
मराठा आंदोलकांविरोधात गुन्हा, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये मराठा आंदोलकांनी काँग्रेसच्या सर्व नेत्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मराठा आंदोलकांनी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन त्यांना मराठा आंदोलनाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. त्यानंतर नाना पटोले यांच्या गाडीत असलेले काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांना अडवण्याचा प्रयत्न मराठा आंदोलकांकडून करण्यात आला. त्यानंतर मराठा आंदोलकांनी कार्यक्रमस्थळाबाहेर नाना पटोले यांना घेरलं. मराठा आंदोलकांनी नाना पटोले यांच्यासमोर आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर नाना पटोले यांनी मराठा आंदोलकांची गाडीखाली उतरून भेट घेतली. मराठा आंदोलकांसोबत चर्चा करताना नाना पटोले यांनी आम्ही तुमच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहोत, असे आश्वासन दिले.
आगामी काळात आम्हीदेखील मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आग्रही आहोत. हा लढा आम्ही देखील लढणार आहे, असे देखील नाना पटोले यांनी मराठा आंदोलकांना सांगितले. तर नाना पटोले यांच्यासोबत बोलताना मराठा आंदोलकांनी विजय वडेट्टीवार यांचा निषेध व्यक्त केला. सक्षम विरोधी पक्ष नेता महाराष्ट्राला द्या, अशी विनंतीदेखील मराठा आंदोलकांनी नाना पटोले यांच्याकडे केली आहे.
हे ही वाचा