कर नाही त्याला डर कशाला? ; ईडी विरोधातील आंदोलनावर संजय राऊतांची भूमिका
‘तूर्त प्रदर्शनाची गरज नाही, रस्त्यावर ऊतरायचे तेव्हा ऊतरू. पण हया कारणासाठी नाही. बेकायदेशीर आणि राजकीय सुडाच्या कारवाईस कायद्यानेच चोख उत्तर देऊ’ असं संजय राऊत म्हणाले.
मुंबई : गेल्या काही दिवसात शिवसेना नेत्यांवर ईडीने केलेल्या कारवाईमुळे शिवसेना आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळेच ईडी विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. येत्या 5 जानेवारीला महाराष्ट्रातून शिवसैनिक मुंबईत दाखल होणार असल्याचं बोललं जात आहे. या सर्व चर्चांना शिनसेना खासदार संजय राऊत यांनी पूर्णविराम दिला आहे. ‘तूर्त प्रदर्शनाची गरज नाही, रस्त्यावर ऊतरायचे तेव्हा ऊतरू. पण हया कारणासाठी नाही. बेकायदेशीर आणि राजकीय सुडाच्या कारवाईस कायद्यानेच चोख उत्तर देऊ’ असं संजय राऊत म्हणाले.
दरम्यान येत्या 5 जानेवारीला वर्षा राऊत ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत. त्यावेळी अनेक शिवसैनिक त्यांच्यासोबत हजर असतील अशा चर्चा होत्या. एकप्रकारचं शक्तीप्रदर्शन शिवसेनेकडून केलं जाणार होतं. पण खुद्द संजय राऊत यांनी मोर्चाच्या सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी सायंकाळी आपली भूमिका समाजमाध्यमांवर मांडली.
संजय राऊत म्हणतात
“आंदोलनाच्या बातम्या चुकीच्या आहेत. रस्त्यावर ऊतरायचे तेव्हा ऊतरू. पण हया कारणासाठी नाही. बेकायदेशीर आणि राजकीय सुडाच्या कारवाईस कायद्यानेच चोख उत्तर देऊ. कर नाही त्याला डर कशाला? शिवसेनेची शक्ती पाठिशी आहेच. तूर्त प्रदर्शनाची गरज नाही. शिवसैनिक आणि शिवसेना प्रेमींची अस्वस्थता मी समजू शकतो.” असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे.
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यापाठोपाठ शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीची नोटीस आल्यानं शिवसेना आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. प्रताप सरनाईकांसह त्यांच्या दोन्ही मुलांनाही ईडीची नोटीस आली आहे. ईडीच्या नोटीसा म्हणजे सरकार पाडण्यासाठी केंद्र सरकारचं षडयंत्र असल्याचा शिवसेनेने आरोप केला होता.
वर्षा राऊत 5 जानेवारीला ईडी चौकशीसाठी हजर राहतील अशी शक्यता आहे. ईडीने वर्षा राऊत यांना 29 डिसेंबर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. परंतु वकिलांशी सल्लामसलत करण्यासाठी त्यांनी 5 जानेवारीपर्यंत मुदतवाढ मागितल्याचं कळतं. 55 लाख रुपयांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीला वर्षा राऊत यांची चौकशी करायची आहे, ज्यात वर्षा राऊत यांनी पीएमसी बँक खात्यामधून आर्थिक व्यवहार झाले होते. ईडीने त्यांना नोटीस पाठवून 29 डिसेंबर रोजी चौकशीसाठी कार्यालयात हजर होण्याने निर्देश दिले होते.
संबंधित बातम्या