Nashik Drought : नाशिक जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट, सिन्नर तालुक्यातील 41 गावात पेरणीही झाली नाही; शेतकरी चिंतेत
Nashik Rain Update : नाशिक जिल्ह्यात जशी उन्हाळ्यामध्ये परिस्थिती असते, तशीच काहीशी परिस्थिती यंदा पावसाळ्यात पाहायला मिळत आहे.
नाशिक : श्रावण महिना (Shravan Month) संपत आला तरी देखील अद्याप पावसाचा पत्ता नाही. काही दिवसांवर पोळा येऊन ठेपला, मात्र पिका योग्य पाऊसच नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. अजूनही शेतकरी पावसाची वाट पाहत असून आभाळ भरून येतं, मात्र पुन्हा ऊन पडून सूर्याचे दर्शन होत आहे. नाशिक जिल्ह्यावर देखील दुष्काळाचे सावट असून सिन्नर (Sinner) तालुक्यातील 41 गावात अद्याप पेरणीही झाली नाही (Water Crisis) तर जिल्ह्यातील इतर भागांत पिकं करपण्यास सुरुवात झाली आहे.
नाशिक जिल्ह्यातील (Nashik) अनेक भागांत अशीच परिस्थिती असल्याचे चित्र आहे. जशी उन्हाळ्यामध्ये परिस्थिती असते, तशीच काहीशी परिस्थिती यंदा पावसाळ्यात पाहायला मिळत आहे. ऑगस्ट महिना देखील संपत आला असून अद्यापही पाऊस पडलेला नाही, पावसाचा (Nashik Rain) सीझन आता संपत आलेला आहे. आणि येत्या काळामध्ये कांद्याची रोप असतात, शेतकऱ्यांची सोयाबीन आता सोंगणीला आलेली असते. परंतु यावर्षी काही भागांत पेरणीयोग्य पाऊस झालेला नसल्याची परिस्थिती असून जेमतेम 5-10 टक्के लोकांनी पेरणी केली होती. परंतु त्यांनाही पिके डोळ्यासमोर जळताना दिसत आहे. ऐन पावसाळ्यात नाशिक जिल्ह्यावर दुष्काळ सदृश्य (Nashik District Drought) परिस्थिती निर्माण झाली आहे, जी परिस्थिती मार्च एप्रिल मे महिन्यात पहायला मिळते, तीच परिस्थिती यंदा ऑगस्ट महिन्यात पाहायला मिळत आहे.
नाशिक जिल्ह्यावर देखील दुष्काळाचे सावट असून सिन्नर तालुक्यातील 41 गावात अद्याप पेरणी ही झाली नाही, तर जिल्ह्यातील इतर भागात पिकं करपण्यास सुरुवात झाली आहे. तर 44 महसुली मंडळ अशी आहेत, ज्या भागात गेल्या 21 दिवसांपासून एक थेंबही पावसाचा बरसलेला नाही. त्यामुळे नजीकच्या भविष्यात शेती पिकांसह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. अद्याप नाशिक जिल्ह्यात 56 टक्के पाऊस झाला असून धरणातील उपयुक्त पाणीसाठा केवळ 77 टक्के त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. शेतात बाजरी पेरून दिली, आज पाऊस होईल, उद्या पाऊस होईल मात्र पावसाचे 90 दिवस होऊनही अद्याप पाऊस होत नसल्याने आमच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिल्याचे शेतकरी म्हणाले.
दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी
नाशिकच्या सिन्नर तालुक्याबरोबर काही तालुक्यांचा विचार केला तर दुधाचा मुख्य व्यवसाय केला जातो. या दुधाच्या व्यवसायासाठी जनावरांना, गाईंना चारा लागतो. तो चारा मात्र आठ ते पंधरा दिवसांमध्ये पूर्णपणे संपणार आहे. त्यानंतर जनावर सांभाळायची कशी? त्यांना पाणी आणि चारा द्यायचा कसा? हा फार मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. कारण जनावरांसाठी साधारण बाजरी, मका आदी पिके घेतली जातात, या पिकाच्या माध्यमातून जनावरांना चारा दिला जातो. मात्र सद्यस्थितीत पाऊस नसल्याने यातलं एकही पीक नीटसं येऊ शकलेले नाही. परिणामी चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊन दूध आणायचं कुठून असा पेचप्रसंग शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. साधारण ऑगस्ट महिन्यापर्यंत पुरेपूर पाऊस झालेला असतो. परंतु यावर्षी पाऊस नसल्यामुळे आम्ही ग्रामसभेचा ठराव केला असून दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना मदत मिळावी आणि त्यानंतर येत्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी चारा छावण्या सुरू व्हाव्यात आणि शेतकऱ्यांच्या जनावरांना चारा आणि पाणी मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
Nashik Rain Update : नाशिक जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट, सिन्नरमधील 41 गावात पेरणी नाही