Nanded : फायनान्स कंपनीवाल्याकडे सापडला अवैध तलवारींचा साठा, नांदेड पोलिसांची कारवाई
दहा दिवसात नांदेडमध्ये दुसऱ्यांदा अवैध तलवारींचा मोठा साठा हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
नांदेड: नांदेडमध्ये एका फायनान्स कंपनीवाल्याकडे अवैध शस्त्र साठा सापडला आहे. पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत तो शस्त्रसाठा जप्त केला आणि या प्रकरणी एकाला अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून नांदेड पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई सुरु केली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
नांदेडमधील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येनंतर नांदेड पोलिसांकडून अवैधरित्या हत्यार बाळगणाऱ्या गुन्हेगारांना शोधून त्यांच्याकडील हत्यारं हस्तगत करण्यात येत आहेत. दहा दिवसांपूर्वी शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या डिबी पथकाने कारवाई करत 25 तलवारींचा मोठा साठा जप्त केला होता. दरम्यान आज पुन्हा एकदा शिवाजीनगर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे दत्तनगरातील एका फायनान्स ऑफिसवर छापेमारी केली. त्यावेळी त्या ठिकाणी बेकायदेशीर शस्त्रांचा साठा सापडला.
नांदेड पोलिसांनी सदर कार्यालयावर छापा मारला असता, त्या ठिकाणी आठ तलवारी ,एक खंड्डा, एक गुप्ती असे एकूण दहा शस्त्रं हस्तगत करण्यात आली आहेत. या कार्यवाहीत सुनिलसिंग भगतसिंग आडे (वय 23 वर्षे) या युवकाला अटक करण्यात आली आहे. सदर युवक हा फायनान्स कंपनीचा मालक आहे. दरम्यान अवैध हत्यार बाळगल्या प्रकरणी आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, शहरातील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या झाल्यानंतर नांदेड पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं आहे. यामध्ये आतापर्यंत 65 गुन्हेगारांना गजाआड केले आहे. तर या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये 35गावठी पिस्तुल, एअर गन, तलवारी, खंजर आणि तब्बल 25 तलवारीचा मोठा साठा नांदेड पोलिसांनी आतापर्यंत हस्तगत केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- धक्कादायक! डॉक्टरकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नांदेड जिल्ह्यातील घटनेने खळबळ
- Nanded : कुख्यात गुन्हेगार रिंदाच्या दहशतीत नांदेडातील व्यावसायिक; अनेकांनी उद्योग गुंडाळून काढला पळ
- Nanded : हरविंदरसिंग रिंदाच्या साथीदारांच्या घरी आणि शेतात पोलिसांचे धाडसत्र