एक्स्प्लोर
नाणार प्रकल्प रद्द का करत नाही?, राणेंच्या प्रश्नावर देसाई म्हणाले...
एवढा विरोध असूनही नाणार प्रकल्प का रद्द करत नाही? असा सवाल नितेश राणे यांनी विधानसभेत उपस्थित केला.

मुंबई : कोकणातील नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठी भूसंपादन थांबवण्यात आल्याची माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली. जनतेचा विरोध असूनही सरकार नाणार प्रकल्प रद्द का करत नाही? असा सवाल आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत विचारला. त्यावर भूसंपादन थांबवल्याचं सुभाष देसाई यांनी सांगितलं.
भूसंपादनाचा अध्यादेश रद्द करण्याच्या मागणीसाठी नाणार प्रकल्पग्रस्तांचं कालपासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने नाणार प्रकल्पग्रस्त सामील झाले आहेत.
या मुद्द्यावरुन नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली. कोकणातील 95 टक्के जनतेचा नाणार प्रकल्पाला विरोध आहे. तसा ठरावही उद्योग मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. शिवाय नाणार प्रकल्प आम्ही सुरु करणार नसून, तसं झाल्यास मी राजीनामा देईन, असं सुभाष देसाईंनी वारंवार सांगितलं आहे. त्यामुळे एवढा विरोध असूनही नाणार प्रकल्प का रद्द करत नाही? असा सवाल नितेश राणे यांनी विधानसभेत उपस्थित केला.
नितेश राणेंच्या या प्रश्नाला उत्तर देताना सुभाष देसाई म्हणाले की, "कोकणातील सर्वच ग्रामपंचायतींनी नाणार प्रकल्पाला विरोध केला आहे. त्यामुळे भूसंपादन शक्य नाही. म्हणून नाणार प्रकल्पासंबंधी उद्योग मंत्रालयाकडून भूसंपादनाची कारवाई थांबवण्यात आली आहे. तसेच उद्योग विभागाकडून भूसंपादनाची कारवाई होत असेल, तर त्याची माहिती मला द्या, मी त्याबाबत कारवाई करेन.
आणखी वाचा























