उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंसह 'मातोश्री'च्या सुरक्षेबद्दल मोठा निर्णय
Uddhav Thackeray security : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
Uddhav Thackeray security : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांची अतिरिक्त सुरक्षा कमी केल्याचे समजतेय. मातोश्री परिसरातील सुरक्षा देखील कमी केली आहे.
आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, तेजस ठाकरे यांच्या ताफ्यातील एक एक एस्कॉर्ट व्हॅन काढण्यात आली आहे. त्याशिवाय सहा सुरक्षारक्षक कमी केले आहेत. मातोश्रीवर असलेली दोन्ही गेटवरील सुरक्षा कमी करण्यात आली आहे. पायलट सुद्धा काढण्यात आल्याचे समजतेय. मुंबई पोलिसांनी सुरक्षा कमी केली नसल्याचे सांगितलेय. तर खासदार विनायक राऊत यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले तर नितेश राणे यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत.
सुरक्षेत कपात नाही - मुंबई पोलीस
मुंबई पोलिसांच्या हद्दीत राहणार्या कोणत्याही वर्गीकृत संरक्षित व्यक्तीच्या सुरक्षेच्या प्रमाणात कोणतीही कपात नाही, अशी माहिती देण्यात येत आहे. ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेत कपात झाली अशी माहिती फिरत होती, पण मुंबई पोलिसांनी ते चुकीचं ठरवत अशी कुठलीही कपात झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
खासदार विनायक राऊत काय म्हणाले -
मातोश्रीच्या दारापासून ते उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत या गद्दार सरकारने सुरक्षित कपात केली आहे. द्वेष भावनेतून ही सुरक्षा व्यवस्थेतील कपात करण्यात आली आहे. याउलट गद्दार सरकारच्या ठाण्यातल्या नगरसेवकांपासून ते पीएपर्यंत सर्वांना अतिरिक्त सुरक्षा देण्यात आली आहे. सूड भावनेतून हे निर्णय घेतले जातात. अतिशय निंदनीय आहे. उद्धव ठाकरे हे फक्त एका पक्षाचे प्रमुख नव्हे तर माजी मुख्यमंत्री सुद्धा आहेत. देश विदेशातील दहशतवादी संघटनेकडून त्यांना धोका वर्तवण्यात आला आहे. तरीही सरकार त्यांचं कर्तव्य पूर्ण करत नाही. आम्हाला सुरक्षेची भीक नको. आमचे शिवसैनिक मातोश्री आणि ठाकरे परिवाराला सुरक्षा देण्यासाठी खंबीर आहेत, असे खासदार विनायक राऊत म्हणाले.
नितेश राणे काय म्हणाले ?
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानतो, कारण त्यांनी उद्धव ठाकरेंची सुरक्षा कमी केली. ज्यांना कोण कधी मच्छर पण मारायला येणार नाही, जे सातत्याने घटनाबाह्य सरकार असे म्हणत हे सरकार बेकायदेशीर आहे असे म्हणायचे आणि दुसरीकडे सरकारने दिलेल्या सुरक्षेत फिरायचे आणि स्वतःचे महत्व वाढवायचे. बाळासाहेब ठाकरे यांना दिलेली सुरक्षा ही त्यांच्या हिंदुत्वासाठी आणि त्यांनी घेतलेल्या भूमिकांसाठी होती. जर उद्धव ठाकरे आणि त्याच्या कुटूंबाला सुरक्षा वाढवायची असेल तर स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करा आणि घ्या, असे नितेश राणे म्हणाले.