Mumbai Goa Highway: दरड कोसळण्याच्या प्रमाणात वाढ, परशुराम घाट 9 जुलैपर्यंत वाहतुकीसाठी बंद
अतिवृष्टी आणि परिस्थीती पाहून हा घाट पुन्हा वाहतुकीसाठी सुरू करायचा की नाही हे 9 जुलैला ठरवण्यात येईल असं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.
मुंबई: सततच्या मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे आजपासून 9 तारखेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी हा घाट बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अतिवृष्टी आणि परिस्थीती पाहून हा घाट पुन्हा वाहतुकीसाठी सुरू करायचा की नाही हे 9 तारखेला ठरवण्यात येईल असं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.
सध्या रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असून 9 जुलैपर्यंत जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळं परशुराम घाटातील दरड खाली कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हा घाट वाहतुकीसाठी धोकादायक स्थितीत असल्यानं प्रशासनाने योग्य ती खबदारी घेतली असून हा घाट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
या आधी 02 जुलै 2022 रोजी परशुराम घाटामध्ये दरड कोसळल्यामुळे घाट रस्ता बंद झालेला होता. पहाटे साडेतीनच्या सुमारास दरड बाजूला करुन पुन्हा वाहतूक सुरु करण्यात आली. त्यानंतर दरड खाली येण्याचे प्रमाण वाढतचं राहिले. त्यामुळे 5 जुलै रोजी वाहतूक बंद करण्यात आली. या ठिकाणी अतिवृष्टी सुरू असून घाटामध्ये अनेक ठिकाणी धोकादायक दरडी कधीही खाली येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. 09 जुलै रोजी पर्यंत हवामान खात्याकडून जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
त्यामुळे या ठिकाणी दरडी कोसळून जीवित हानी होवू नये याकरीता 6 जुलै पासून 9 जुलैपर्यंत परशुराम घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात यावा असा अहवाल कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण आणि रत्नागिरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. त्यानंतर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वरील परशुराम घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्याचा आदेश प्रशासनाने दिला. 9 जुलै रोजी परशुराम घाटाची परिस्थिती पाहून आणि अतिवृष्टी यांचा विचार पुढील निर्णय घेण्यात येईल. बंदी कालावधीत केवळ कमी वजनाची वाहतूक ही चिरणी-आंबडस-चिपळूण या पर्यायी मार्गाने वळविण्यात यावेत असं आदेशात नमूद केले आहे.
जगबुडी नदी धोका पातळीवर
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 24 तासात 154.89 मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली असून सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही मात्र जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदी धोका पातळीवरून वाहत आहे. संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री नदी, राजापूर तालुक्यातील कोदवली नदी इशारा पातळी वरून वाहत आहेत. सदर भागातील नागरिकांचे आवश्यकतेनुसार स्थलांतर करण्यात येत असून नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या असून जिल्हा प्रशासन सतर्क आहे.