साताऱ्यात उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंची धावती भेट
साताऱ्यातील जावळी येथील एका मंदिर सोहळ्याच्या कार्यक्रमप्रसंगी उदयनराजे आणि शिवेंद्रराजे एकत्र आले होते. एकत्र आल्यानंतर दोघांनीही एकमेकांना हस्तांदोलन केलं.

सातारा : साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वाद अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे. मात्र काल दोन्ही नेते एका कार्यक्रमानिमित्त एकत्र आले हेत. त्यावेळी त्यांनी एकमेकांना हस्तांदोलन केलं आणि एकमेकांना शाब्दिक टोलेही लगावले. या नेत्यांच्या धावत्या भेटीची सध्या साताऱ्यात जोरदार चर्चा सुरु आहे.
साताऱ्यातील जावळी येथील एका मंदिर सोहळ्याच्या कार्यक्रमप्रसंगी उदयनराजे आणि शिवेंद्रराजे एकत्र आले होते. एकत्र आल्यानंतर दोघांनीही एकमेकांना हस्तांदोलन केलं. दरम्यान उदयनराजेंनी आमदार शिवेंद्रराजेंचा खांदा दाबला. त्यावर तुम्ही माझा सारखा खांदा का दाबता? असा प्रश्न शिवेंद्रराजेंनी विचारला.
त्यावर मी तुमची फिटनेस चेक करत असतो, असं मिश्कील उत्तर उदयनराजेंनी दिलं. उदयनराजेंच्या उत्तरानंतर दोन्ही नेत्यांसोबत असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये एकच हशा पिकला.
उदयनराजे साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार आहेत. तर त्यांचे चुलतबंधू शिवेंद्रराजे हे साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. बऱ्याचदा त्यांनी एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. राजकारणाबरोबरच मैदानातही त्यांचे समर्थक अनेकदा भिडले आहेत. कधी दोघांची समोरासमोर आलेली गाडी आधी कोण मागं घेणार यावरुनही त्यांचा वाद रंगला आहे.
तर कधी दगडफेक, टोलवरुन वाद, विकासकामांवरुन त्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. साताऱ्यातील तरुणांचा आयकॉन कोण म्हणून दोघांमध्ये सूप्त स्पर्धाही रंगलेली सर्वांनी पाहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
