Modi Cabinet Expansion: महाऱाष्ट्रातून 'या' नेत्यांची केंद्रीय मंत्रिपदासाठी चर्चा
नारायण राणे यांच्यासह कपिल पाटील, हिना गावित, रणजीत निंबाळकर, भागवत कराड यांची नावे देखील मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. कपिल पाटील सध्या दिल्लीत आहेत.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 जुलै रोजी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारात जवळपास 17 ते 22 नवीन मंत्र्यांना मंत्रिमंडळात संधी मिळू शकते. काही मंत्र्यांना अतिरिक्त मंत्रीपदाचा कार्यभारही मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक मंत्र्यांची नावं मंत्रिमंडळातून कमी होतील असाही एक अंदाज वर्तवला जातोय. मंत्रिमंडळात सामील होण्याची चर्चा असणारे नेते आता हळूहळू दिल्लीत पोहोचू लागले आहेत, राज्यातून खासदार नारायण राणे दिल्ली पोहोचले आहेत. राज्यातील इतर अनेक नावांची चर्चा आहे.
कपिल पाटील, हिना गावित, रणजीत निंबाळकर, भागवत कराड यांची नावे देखील मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. कपिल पाटील सध्या दिल्लीत आहेत. एबीपी माझाने त्यांचा संपर्क साधला असता ओबीसी संसदीय समितीची उद्या बैठक आहे, त्यासाठी दिल्लीला आलो असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
नारायण राणे देखील दिल्लीत आहेत. नारायण राणे यांना भाजपचे राष्ट्रीय अ्ध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेण्यास सांगण्यात आलं आहे. रणजीत निंबाळकर यांच्याशी संपर्क साधला असता ते मुंबईतच होते, मात्र आता ते फलटणला निघाले असल्याची माहिती मिळत आहे. भागवत कराड देखील मुंबईतच आहेत.
नारायण राणेंना संधी मिळाली तर महाराष्ट्र भाजपला काय फायदा?
- आक्रमक नेते म्हणून नारायण राणे परिचित, शिवसेना आणि उद्धव ठाकरेंशी जुना संघर्ष.
- कोकणात भाजपची ताकद वाढण्यास मदत होईल. शिवाय शिवसेना आणि उद्धव यांच्या विरोधात बुलंद आवाज मिळेल.
- मंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून काम केल्यामुळे प्रशासन हाताळण्यात हुशार.
कपिल पाटलांचाही वर्णी लागणार का?
- 2014 आधी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झाले. देवेंद्र फडणवीस यांच्याशी उत्तम संबंध.
- कपिल पाटील हे आगरी समाजातले आहेत, ओबीसी चेहरा असल्यानं पक्षाला फायदा होईल.
- ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी अडचणीत असताना कपिल पाटलांना पद देणं सूचक कृती.
- नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटलांचं नाव देण्यास शिवसेना तयार नाही, त्या पार्श्वभूमीवर आगरी नेत्याला मंत्रिपद मिळणं महत्त्वाचं.
हिना गावित
- सर्वात तरुण खासदार म्हणून 2014 मध्ये पहिल्यांदा लोकसभेत भाजपच्या तिकीटावर निवडून आल्या.
- वडील माजी मंत्री विजयकुमार गावित यांचा वारसा, देवेंद्र फडणवीसांशी उत्तम संपर्क.
- नंदुरबार मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला पण हिना गावित यांनी मोडून काढला..
- हिना कार्यक्षम आणि तरुण खासदार आहेत, आदिवासी समाजातून येतात, पेशानं डॉक्टर आहेत.
- मोदींच्या मंत्रिमंडळात हिना यांना प्रवेश मिळाल्यास महिला आणि अनुसुचित जमातींना प्रतिनिधित्व मिळेल.
अनेक मंत्रिपदं रिक्त
शिवसेना आणि अकाली दल एनडीएमधून बाहेर निघाले तसेच रामविलास पासवान व इतर काही मंत्र्यांच्या निधनानंतर सर्व मिळून अनेक मंत्रिपदे रिक्त आहेत. सध्या मोदी मंत्रिमंडळात फक्त 53 मंत्री आहेत. तर घटनेनुसार मंत्र्यांची संख्या जास्तीत जास्त 79 असू शकते. त्यामुळे सध्या मोदींच्या मंत्रिमंडळात 26 मंत्रिपदं रिक्त आहेत. तिथे कुणाची वर्णी लागणार येत्या दोन दिवसात स्पष्ट होईल.
अतिरिक्त मंत्रिपदाचा भार कमी केला जाऊ शकतो
ज्योतिरादित्य शिंदे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात जागा मिळणार हे जवळपास निश्चित झालं आहे. दिल्लीतून त्यांना फोन आला असून संध्याकाळपर्यंत ते दिल्लीत पोहोचतील. तसेच वरुन गांधी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे. संभाव्य फेरबदलात अनेक मंत्र्यांची नावं कमी केली जाऊ शकतात, तर काहींचा मंत्रिपदाचा भार कमी केला जाऊ शकतो. यामध्ये नरेंद्र सिंह तोमर, रवीशंकर प्रसाद, डॉ. हर्षवर्धन, प्रकाश जावडेकर, पियुष गोयल आणि प्रह्लाद जोशी यांच्याकडील अतिरिक्त मंत्रालयाची जबाबदारी कमी केली जाऊ शकते.