MLC Election 2022 : आदित्य ठाकरे रात्री साडेबारा वाजता शिवसेना आमदारांच्या भेटीला, हॉटेलमध्येच मुक्काम
MLC Election 2022 : आदित्य ठाकरे रात्री साडेबारा वाजता आमदारांची भेट घेण्यासाठी पवईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये दाखल झाले. त्यानंतर ते देखील हॉटेलमध्येच मुक्कामाला थांबले. शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं आहे.
MLC Election 2022 : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदारांना हॉटेल वेस्टिन या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे. या आमदारांना भेटण्यासाठी शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे हे रात्री साडे बारा वाजता दाखल झाले. यावेळी अदित्य ठाकरे यांनी हॉटेलच्या कॉफी शॉपमध्ये कॉफी घेत छोटी बैठक घेतली. या बैठकीत परिवहन मंत्री अनिल परब, खासदार अनिल देसाई, कृषीमंत्री दादा भुसे आणि काही आमदार उपस्थित होते. विधानपरिषद निवडणुकीच्या पार्शवभूमीवर आणि इतर काही विषयांवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. तासभर चर्चा झाल्यानंतर अदित्य ठाकरे हॉटेलमध्येच मुक्कामाला थांबले.
विधानपरिषद निवडणुकीच्या आधी शिवसेनेने गुरुवारी (17 जून) आपल्या आमदारांची पवईतील हॉटेल वेस्टिनमध्ये राहण्याची सोय केली. मागील आठवड्यात राज्यसभा निवडणुकीत झालेली क्रॉस व्होटिंग पाहता खबरदारी म्हणून शिवसेनेने आमदारांना मतदानाच्या दोन-तीन दिवस आधीच हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला.
शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबतच्या बैठकीसाठी बोलावलं होतं. बैठकीनंतर शिवसेना नेते अनिल देसाई यांनी मीडियाशी बातचीत करताना सांगितलं की, "पक्षाच्या सर्व आमदारांना 20 जून रोजी होणाऱ्याविधानपरिषद निवडणूक आणि त्यासाठी होणाऱ्या मतदान प्रक्रियेदरम्यान कोणी काळजी घ्यावी, याबाबत प्रशिक्षण आणि माहिती देण्यात आली आहे." सर्व अपक्ष आमदार आणि छोट्या पक्षाच्या आमदारांचा महाविकास आघाडीला पाठिंबा असल्याचा दावा अनिल देसाई यांनी केला.
10 जागांसाठी 11 उमेदवार मैदानात
राज्यसभेप्रमाणे विधानपरिषद निवडणूकही चुरशीची होण्याची शक्यता आहे. कारण महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी 11 उमेदवार मैदानात आहेत. भाजकडून प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय, प्रवीण दरेकर, उमा खापरे आणि राम शिंदे हे पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमशा पाडवी, काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हांडोरे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.
विधानपरिषदेवर निवडून येण्याचे गणित काय?
- नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतांचा अधिकार मिळाला नाही त्यामुळे आता मतांचा कोटा 26 वर आला आहे.
- राज्यसभेप्रमाणे मतदान झालं तर भाजपकडे सध्या 123 संख्याबळ आहे.
- त्यामुळे भाजपच्या 4 जागा सहज निवडून येऊ शकतात.
- पाचव्या उमेदवारासाठी भाजपला 7 मतं कमी पडतात
- महाविकास आघाडीकडे 161 संख्याबळ आहे.
- त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन आमदार विधान परिषदेत जातील.
- तर मित्र पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने काँग्रेसच्या वाट्यालाही दोन जागा येऊ शकतात.