अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यासाठी मातोश्रीवर मशाल मोर्चा, विनायक मेटेंची एबीपी माझाला माहिती
मराठा आरक्षणाच्या स्थगितीला मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण कारणीभूत आहेत. आम्ही अनेकवेळा मागणी करून देखील आरक्षणाचा प्रश्न अशोक चव्हाण यांनी गांभीर्याने घेतला नाही, असे विनायक मेटे म्हणाले.
मुंबई : मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरून अशोक चव्हाण यांना हटवा या मागणीसाठी येत्या शनिवारी 7 नोव्हेंबरला मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. हा मशाल मोर्चा शनिवारी संध्याकाळी 6 वाजता वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालय ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री या बंगल्यापर्यंत काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे आयोजन मराठा क्रांती मोर्चा यांच्यावतीने करण्यात आलं असून आमचा पक्ष शिवसंग्राम याचा पूर्ण पाठींबा या मोर्चाला असेल अशी भूमीका शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांनी जाहीर केली आहे.
याबाबत बोलताना शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या स्थगितीला मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण कारणीभूत आहेत. आम्ही अनेकवेळा मागणी करून देखील आरक्षणाचा प्रश्न अशोक चव्हाण यांनी गांभीर्याने घेतला नाही. परिणामी समाजाला सुप्रीम कोर्टातील स्थगितीला सामोरे जावं लागलं. त्यामुळे आम्ही आता राज्यभरात ठिकठिकाणी मोर्चे, आंदोलने करत आहोत. या संपूर्ण प्रश्नी आम्ही लवकरच राष्ट्रवादीचे प्रमुख आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांची भेट घेणार आहोत. यासोबतच आम्ही महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांची देखील वेळ मागितली आहे.
आमची प्रामुख्याने मागणी आहे की, मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदी एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांची नियुक्ती करा. आम्हांला आता अशोक चव्हाण यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. या संपूर्ण आरक्षणाचा विषय हा विद्यार्थी वर्गाशी निगडित आहे. त्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांना सध्या कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच कोणकोणत्या विभागातील विद्यार्थ्यांची भरती होऊन त्यांची नियुक्ती रखडली आहे. हे पाहण्यासाठी मराठा आरक्षण विद्यार्थी व युवा परिषदेचे आयोजन केले आहे. ही परिषद 5 नोव्हेंबरला बीडला सकाळी 11 वाजता सुरू होईल. आशा प्रकारचे मेळावे, आंदोलने, परिषदा घेण्याची वेळ आम्हांला या सरकारमुळे आली आहे. आता मराठा समाज या प्रश्नाचा पॉझिटिव्ह निकाल लागेपर्यंत माघार घेणार नाही.
दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या भेटीबाबतच्या प्रश्नावर बोलताना विनायक मेटे म्हणाले की, सध्या मंत्रिमंडळातील सदस्य बेजबाबदारपणे बोलत आहेत. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण बेजबाबदार पणे वागत आहेत. त्यामुळे आम्ही वारंवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची मागणी करत आहोत. परंतु आद्यप त्याबाबत काहीच पाऊल उचलताना पाहिला मिळतं नाहीत. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागणी मान्य न केल्यास आम्ही राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांची भेट घेऊ. कारण घटनात्मक पद्दतीने राज्य कारभार चालावा यावर देखरेख करण्याची जबाबदारी राज्यपालांचीच असते. त्यामुळे आम्ही राज्यपालांची भेट घेणार आहोत.