Dasara Melava 2022 : योग्य वेळी योग्य निर्णय घेतला; शरद पोंक्षेंकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच कौतुक
Dasara Melava 2022 : सद्सद विवेकबुद्धी जागृत ठेवून योग्य वेळी योग्य निर्णय घेतला असं म्हणत अभिनेते शरद पोंक्षे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं.
Dasara Melava 2022 : "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी अर्जुनाची भूमिका केली आहे. सद्सद विवेकबुद्धी जागृत ठेवून योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आणि हा जमलेला जनसमुदाय हे त्याचं उत्तर आहे." अशा शब्दांत मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते शरद पोंक्षे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं. बीकेसीवरील शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी शरद पोंक्षे उपस्थित होते. यावेळी त्यांनी मुख्यंत्र्यांचं कौतुक केलं. तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
'ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केला, ज्या बाळासाहेबांनी म्हटलं होतं की, "ज्या दिवशी शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल तेव्हा मशिदीवरचे भोंगे मी खाली उतरवीन, औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करेन". पण त्यांचे सुपूत्र यातलं काहीच करायला तयार नाहीत. अशी टीका शरद पोंंक्षे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
यावेळी शरद पोंक्षे यांनी दोन गोष्टी सांगितल्या, त्यामध्ये पहिला त्यांनी रावण आणि प्रभू श्रीरामांचा मुद्दा मांडला. "रावणाचा सख्खा भाऊ बीभीषण याला प्रभू श्रीरामांनी माझ्या बाजूने लढायला ये असं कुठलंही निमंत्रण दिलं नव्हतं. पण बीभीषणाची सद्सद विवेकबुद्धी जागृत होती. त्याला हे माहीत होतं हे राम रावण युद्ध आहे, हे सत्य आणि असत्याचं युद्ध आहे. धर्म आणि अधर्माचं युद्ध आहे. या युद्धामध्ये आपल्याला नीतीमत्तेची साथ द्यावी लागणार आहे. सत्याची, धर्माची साथ द्यावी लागणार आहे. म्हणून प्रभू श्रीरामांकडून कोणतंही निमंत्रण न येता रावणाचा सख्खा भाऊ बीभीषण प्रभू श्रीरामाच्या बाजूने राम रावण युद्धामध्ये रावणाच्या विरोधात लढला. पण त्या बीभीषणाचा कोणीही कधीही गद्दार असा उल्लेख केला नाही, असे पोंक्षे म्हणाले.
दुसरे उदाहरण सांगताना ते म्हणाले "महाभारतात जे युद्ध झालं, ज्या भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीगीता सांगितली ती भगवद्गीता तमाम हिंदूंचा धर्मग्रंध आपण मानतो. कर्मयोग ज्याने शिकवला त्या कुरुक्षेत्रावरती जेव्हा लढायला पांडव आणि कौरव समोरासमोर ठाकले तेव्हा समोर कर्ण होता. कर्ण हा तितकाच ताकदवान होता. त्याला हरवणं तितकं सोपं नव्हतं. तेव्हा चिखलात कर्णाचा रथ अडकला असता श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की,"अर्जुना हीच वेळ आहे. कर्णाला संपवण्याची. उचल ते धनुष्य आणि मार कर्णाला. तेव्हा अर्जुन म्हणाला, "असं कसं मारू? तो निशस्त्र आहे. तो युद्धाला तयार नाहीये. त्यावर श्रीकृष्ण म्हणाला ज्याक्षणी त्याने अधर्माची साथ दिली, दुर्योधनाची साथ दिली त्याच श्रणी त्याला कुठल्याही परिस्थितीत, कोणत्याही मार्गाने मारण्याचा अधिकार त्यानेच तुला प्राप्त करून दिलेला आहे. तेव्हा त्या अर्जुनाला पाठीत कोणीही खंजीर खुपसला असं म्हटलं नाही.
महत्वाच्या बातम्या :