मोठी बातमी! पहिल्याच दिवशी मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणाची मोबाईल ॲप बंद; मागील दीड तासांपासून सर्वर ठप्प
Maratha Reservation Survey : छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी ही समस्या उद्भवल्यामुळे मराठा सर्वेक्षण ठप्प आहे.
Maratha Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणाला (Maratha Reservation Survey) आजपासून राज्यभरात सुरवात झाली आहे. मात्र, गोखले इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणासाठी तयार करण्यात आलेली मोबाईल ॲप बंद पहिल्याच दिवशी बंद पडली आहे. मागील दीड तासांपासून सर्वर ठप्प असल्याने सर्वेक्षणाचे काम थांबले आहेत. त्यामुळे वेळेत हे सर्वेक्षण कसे पूर्ण असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मागासवर्ग आयोगाच्यावतीने आज सकाळपासूनच सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली होती. गोखले इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून सर्वेक्षण करणाऱ्या प्रगनकांच्या मोबाईलवर ॲप देण्यात आली असून, त्या माध्यमातून सर्वेक्षणाला सुरुवात झाली. परंतु, मागील दीड तासापासून हे सर्वेक्षण अनेक ठिकाणी बंद पडल्याची माहिती मिळत आहे. सर्वेक्षण करणाऱ्या प्रगनकांना मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये लॉगिन होताना अडथळा येत आहे. त्यामुळे लॉगिन होत नाही. परिणामी हे सर्वेक्षण अनेक ठिकाणी बंद पडले आहे. छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी ही समस्या उद्भवल्यामुळे सर्वेक्षण ठप्प आहे.
काय अडचण येत आहे?
आज सकाळपासून राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणाला सुरवात झाली आहे. गोखले इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून हे सर्वेक्षण केले जात आहे. यासाठी संबधित अधिकाऱ्यांना MSBCC SURVEY नावाचे मोबाईल ॲप देण्यात आले आहेत. ज्यात अधिकाऱ्यांना युजर आईडी म्हणून त्यांचा मोबाईल नंबर देण्यात आला आहे. परंतु, दुपारपासून संबंधित ॲपमध्ये लॉगईनच होत नाही. यावेळी Error Http failure response for https://api.gipesurvey.in/enumerator/otp: 502 Bad Gateway असे इरर्र येत आहे. त्यामुळे सर्वेक्षणाचे काम बंद पडले आहे. एकीकडे 31 जानेवारीपर्यंत हे सर्वेक्षण संपवण्याच्या सूचना मागासवर्ग आयोगाने दिल्या आहेत, मात्र दुसरीकडे मोबाईल ॲप चालत नसल्याने सर्वेक्षण ठप्प पडले आहे. त्यामुळे ठरलेल्या वेळेत हे सर्वेक्षण पूर्ण होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बीड जिल्ह्यात सर्वेक्षणाला सुरवात...
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती मराठा समाजातील व्यक्तींचं सामाजिक आर्थिक सर्वेक्षण करण्यास सुरुवात झाली आहे. बीड जिल्ह्यातील मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीचे यामध्ये सर्वेक्षण केलं जाणार आहे. यासाठी नेमणूक करण्यात आलेल्या राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या मोबाईलमध्ये एक ॲप देण्यात आला आहे. याच ॲपमध्ये 182 प्रश्नावलीच्या माध्यमातून हे सर्वेक्षण केले जात आहे. मात्र, बीड जिल्ह्यात अजून तरी कोणतेही अडचण सर्वेक्षण करतांना आलेली नाही.
इतर महत्वाच्या बातम्या: