एक्स्प्लोर
चक्काजाम आंदोलनात कुठे काय घडलं?
मुंबई : मराठा क्रांती मोर्चाकडून राज्यभरात आज ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन सुरु आहे. मराठा समाजाकडून गेल्या काही दिवसात राज्यात विविध ठिकाणी मूक मोर्चे काढण्यात आले. तसंच मराठा आरक्षणासह अट्रॉसिटी कायद्यात बदल करावेत या मागणीसाठी मुंबईतही 6 मार्चला भव्य मोर्चा काढला जाणार अशी घोषणा आयोजकांकडून करण्यात आली आहे.
आज 31 जानेवारीला राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाची हाक मराठा समाजाकडून देण्यात आली होती. आज या चक्काजाम आंदोलनाचे पडसाद राज्यभरात उठले आहेत.
राज्यभरात कुठे कुठे चक्काजाम?
मुंबई-आग्रा महामार्गावर वाहनांच्या रांगा
मराठा संघटनांच्या चक्काजाममुळे मुंबई आग्रा महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. नाशिकच्या सिन्नर फाटा आणि जत्रा हॉटेल चौकातही मराठा संघटनांनी चक्काजाम आंदोलन सुरु आहे. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.
मुंबईतही मराठा समाजाकडून चक्काजाम
मराठा संघटनांच्या चक्काजाममुळे मुंबई आग्रा महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. नाशिकच्या सिन्नर फाटा आणि जत्रा हॉटेल चौकातही मराठा संघटनांनी चक्काजाम आंदोलन सुरु आहे. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. दादर पूर्वमधील चित्रा टॉकिज परिसरात मराठा समाजाच्या चक्काजामला सुरुवात, लालबाग ते दादर वाहनांच्या मोठ्या रांगा होत्या.
मुंबईतील दादर फ्लायओव्हरवर गटारचे झाकन टाकून कार्यकर्त्यांनी वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला. सिमेंटचं झाकण टाकून कार्यकर्त्यांनी पळ काढला
डोंबिवली, ठाणे, मुलुंड, मुंबई-पुणे महामार्गावर मराठा समाजाचा चक्काजाम करण्यात आला, तर कामोठ्यातील कळंबोली इथे आंदोलन सुरु होतं.
मराठा समाजातर्फे चक्काजामला सुरुवात झाल्यानंतर डोंबिवलीत चार रस्ते जाम केल्याने वाहतुकीवर परिणाम
नागपूर
गणेशपेठ बस स्थानकाजवळ सकल मराठा समाज मोर्चा कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको करण्यात आला. रस्त्यावर बसून वाहतूक अडवण्यात आली. पोलिसांनी वाहतूक पर्यायी रस्त्याने वळवली.
अवघ्या 12 मिनिटानी आंदोलन संपले. मोजकेच कार्यकर्ते आंदोलनात आल्यामुळे पोलिसांनीही काही मिनिट आंदोलन करु देत सर्वांना ताब्यात घेतलं.
सुमारे 25 कार्यकर्ते पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. 11:15 ला आंदोलन सुरु झालं होतं, 11:27 ला संपुष्टात आलं.
अहमदनगरमध्येही चक्काजाम
अहमदनगरमध्ये चैदाही तालुक्यात मराठा समाजाचं चक्काजाम, राज्य मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत, सर्वत्र कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पंढरपूर-सातारा रोड बंद, सकाळी 9 वाजल्यापासून चक्काजामला सुरुवात होती, रस्त्यावर वाहनेच नसून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
सिंधुदुर्गातही मराठा समाजाचं चक्काजाम आंदोलन
सकल मराठा समाजाच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी सिंधुदुर्गमध्येही मराठा मोर्चाकडून 25 ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. पोलीस प्रशासनाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवला होता.
सिंधुदुर्गमधील लाखो मराठा बांधव चक्काजाममध्ये सहभागी झाले होते. सावंतवाडी, कुडाळ व कणकवली मध्ये मोठ्या प्रमाणात मुंबई-गोवा महामार्ग बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कुडाळमधे मुंबई-गोवा महामार्गावर टायर जाळण्यात आले, तर सावंतवाडी हायवेवर बसून रस्ता रोखण्यात आला. कणकवलीत आमदार नितेश राणे यांनी या आंदोलनात सहभाग घेत रस्ता रोखून धरला. पोलिसांकडून त्यांना ताब्यात घेण्यात आलं.
सोबतच बांदा, झाराप, कुडाळ, ओरोस, पणदूर, कसाल, कणकवली, खारेपाटण, दोडामार्ग, आंबोली, सावंतवाडी या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं.
औरंगाबादेत मराठा समाजाचं चक्काजाम आंदोलन
मराठा क्रांती मुक मोर्चाच्यावतीनं आज औरंगाबाद जिल्यात 50 हून अधिक ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. यात औरंगाबाद शहरातील 9 चौकात हे आंदोलन करण्यात आलं. आंदोलनकर्त्यांनी दोन तास ठिकठिकाणी रस्ता अडवून धरला. या आंदोलनात महिलाही मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. या आंदोलनावेळी औरंगाबादेतील 4 ठिकाणी आंदोलनकर्त्यांना पागंवण्यासाठी सौम्य लाठीमार केला. त्यानंतर काही आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली.
हर्सूल टी पॉइंट, आकाशवाणी चौक, ओअॅसिस चौक, वाळूज, महानुभाव आश्रम, पैठण रोड, या ठिकाणी पोलिसांना बऴाचा वापर करावा लागला. मात्र जिल्ह्यात इतर ठिकाणी चक्काजाम आंदोलन शांततेत पार पडलं.
मराठा क्रांती मोर्चा अंदोलकांनी सरकारला बॅनर मार्फत इशारा दिला. आंदोलनकर्त्यांच्या हातात ते बोर्ड होते ज्यावर मुख्यमंत्र्यांना इशारा देण्यात आला होता. मुख्यमंत्री मागण्या मान्य करा निवडणुका आहेत, मुख्यमंत्री आरक्षण द्या इलेक्शन आहे असे बोर्ड पाहावयास मिळाले.
पोलिसांनी अनेक आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. मात्र ज्या ठिकाणी आंदोलनादरम्यान अनुचित प्रकार झाला त्या ठिकाणी आंदोलकांवर गुन्हे दाखल करणार असल्याचं पोलिस आयुक्त अमितेष कुमार यांनी सांगितलं आहे.
नाशिक
नाशिक शहर आणि जिल्ह्यातही मराठा संघटनांनी मंगळवारी चक्काजाम आंदोलन केल. शहरात जत्रा हॉटेल चौक, सिन्नर फाटा, द्वारका चौकात तर जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, कसमादेसह अनेक भागात आंदोलकांनी रास्ता रोको केला.
नाशिकमध्ये सर्वप्रथम सिन्नर फाटा आणि द्वारका चौकात कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरु केलं. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन हे आंदोलन आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सर्व मराठा संघटना जत्रा हॉटेल चौकात एकत्र आल्या.
सुमारे 2 हजार आंदोलकांनी मुंबई आग्रा महामार्गावर ठिय्या आंदोलन केलं. यावेळी महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सुमारे 2 तास चाललेल्या आंदोलनावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यावर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र आंदोलक आणि पोलिसांनी सामोपचारानं घेतल्यानं हा वाद मिटला. अखेर 2 तासानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं
अहमदनगर
अहमदनगर जिल्ह्यात चैदाही तालुक्यात सकल मराठा समाजाचं चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. प्रत्येक तालुक्यातील रस्त्यांवर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. जिल्ह्यातून जाणाऱ्या पाच राज्य मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गावरुन चक्काजाम आंदोलन छेडण्यात आलं होतं. नगर-पुणे, नगर-औरंगाबाद, नगर-सोलापूर, नगर-मनमाड आणि नगर-दौंड मार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. त्याचबरोबर कल्याण-विशाखापट्टनम मार्गावरही चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. यामुळं जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची वाहतूक विस्कळीत झाली होती. शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बाह्यवळण मार्गावरुन वाहतूक वळवण्यात आली होती. त्याचबरोबर कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
कोल्हापूर
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासह अन्य 20 मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्यावतीनं आज कोल्हापुरात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. कोल्हापुरात पुणे- बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर गोकुळ शिरगाव मराठा कार्यकर्ते आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास एकत्र आले. हातात भगवे ध्वज आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देते या कार्यकर्त्यांनी महामार्गाच्या दोन्ही बाजूकडील वाहतूक रोखून धरली.
उस्मानाबाद
सकल मराठा समाजाने मूक मोर्चा काढूनही महाराष्ट्र सरकार आपल्या मागण्यांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात विविध मार्गावरील वाहने अडवून " एक मराठा लाख मराठा" घोषणाबाजी करत तब्बल दोन तासाचा चक्का जाम आंदोलन करण्यात आले ...मराठा समाजाला आरक्षण द्यावे ,अट्रॉसिटी रद्द करावी ,कोपर्डी प्रकरणातील दोषींना फाशी व्हावी या प्रमुख मागण्यांसाठी बहुसंख्य मराठा समाजाचे लोक आज रस्त्यावर उतरले होते. राष्ट्रगीतानं चक्का जामची सांगता करण्यात आली.
परभणी
परभणी जिल्ह्यातही मराठा समाजाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. सकाळी 11 वाजल्या पासूनच जिल्ह्यातली सर्व महामार्गावर चक्का जाम करण्यात आला. परभणी जिल्ह्यातील 9 तालुक्यात हे चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. परभणी, सोनपेठ, गंगाखेड, पाथरी, सेलू, मानवत, जिंतुर, पूर्णा, पालम, तालुक्यासह जिल्हाभरात चक्काजाम करण्यात आला होता.
बीड
आरक्षणासह इतर मागण्यांसाठी बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी आज चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मांजरसूंबा, पाली, बीड, हिरापुर, पाडळशिंगी आणि गेवराईत रास्तारोको मुळे तीन तास वाहतूक ठप्प झाली होती.
तसंच अंबाजोगाई तालुक्यात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. यशवंतराव चव्हाण चौक, धायगुडा पिंपळा, बर्दापूर फाटा आणि लोखंडी सावरगाव येथे आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती.
नंदुरबार
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाभरात चक्का जाम आंदोलन करण्यात आलं. अक्कलकुवा, तळोदा, शहादा, नंदुरबार याठिकाणी आंदोलनामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
धुळे
मराठा समाजाचा जिल्ह्यातील तिन्ही महामार्गांवर रास्ता रोको करण्यात आला. मुंबई-आग्रा, सुरत-नागपूर, धुळे-सोलापूर या तिन्ही महामार्गांवर ठिकठिकाणी रस्ता रोखून धरण्य़ात आला होता.
नांदेड
मराठा आरक्षणासाठी आज संपूर्ण नांदेड जिल्ह्यात रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. जिल्ह्यातील 160 तालुक्यात हे आंदोलन करण्यात आले. सीमावर्ती कर्नाटक आणि तेलंगणा राज्यातून येणाऱ्या वाहनांना या आंदोलनाची पूर्वकल्पना नसल्याने त्यांना आंदोलनाचा फटका बसला. आंदोलनकर्त्यांनी प्रमुख रस्त्यांवर बैलगाड्या लावून रास्ता रोको केला. काही ठिकाणी आंदोलनकर्ते हे रस्त्यावर भजन कीर्तन करत बसले तर काही ठिकाणी जळते टायर रस्त्यावर टाकण्यात आले तर काही ठिकाणी झाडाच्या फांद्या तोडून रस्ते अडवण्यात आले.
हिंगोली
सकल मराठा समाजाच्या वतीने हिंगोली जिल्ह्यात 50 ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. हिंगोली येथील अकोला बायपासवर टायर जाळून चक्क जाम करण्यात आला . सकाळी 11 वाजता सुरु झालेला चक्क जाम आंदोलनामुळे 2-3 किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. महाराष्ट्रात मराठा समाजाच्या वतीने 53 महामोर्चे काढून देखील मराठा समाजाच्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत आहे, मराठा समाजाला आरक्षण दिल नाही शिवाय अट्रोसिटी कायदा अधिक कडक करण्यात आला. शासनाने जर मागण्या त्वरित मान्य केल्या नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला .
यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्यात पुसद ,महागाव आणि उमरखेड येथे आज मराठा समाजाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आलं.
यावेळी शहरातील मुख्य रस्त्यावरही चक्का जाम करण्यात आला.
विविध मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन
मराठा समाजाला आरक्षण, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल अशा प्रमुख मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी चक्काजाम आंदोलन केलं जात आहे. मुंबईतील प्रवेशद्वारांवर चक्काजाम आंदोलन सुरु आहे. दादरमधील चित्रा सिनेमागृह, वरळी नाका, चेंबूर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा याठिकाणी चक्काजाम केला जात आहे. यासह औरंगाबाद, नागपूर, नाशिकसह अनेक शहरात चक्काजाम आंदोलन केलं जातं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement