(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मराठा समाजाचा विश्वासघात कोणी केला?; जरांगे म्हणाले, आता थेट नावाचं उघड करतो...
Manoj Jarange : आमचा ज्यांनी विश्वास घात केला त्यांच्याबद्दल 26 जानेवारीला मुंबईत (Mumbai) सांगणार आहे.
पुणे : आतापर्यंत सगळ्या जगावर आम्ही विश्वास ठेवला. मुंबईत 26 जानेवारीला पोहोचेपर्यंत अजूनही आमचा सर्वांवर विश्वास आहे. मात्र, आमचा ज्यांनी विश्वास घात केला त्यांच्याबद्दल 26 जानेवारीला मुंबईत (Mumbai) सांगणार आहे. एवढच नाही तर विश्वासघात करणाऱ्यांची नावचं 26 तारखेला उघड करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या मुंबई आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस असून, आजच्या पायी दिंडीला सुरवात करण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
पुढे बोलतांना जरांगे म्हणाले की,"छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त चर्चेसाठी आले होते. मात्र, ते जे गेले तर पुन्हा परत आलेच नाही. त्यामुळे चर्चा फिस्कटली असं म्हणता येणार नाही. आज पुन्हा ते येण्याची शक्यता आहे. आल्यावर काय चर्चा होती ती पाहू, असे जरांगे म्हणाले.
वाहनांना बंदी घातल्यास आम्ही मुंबईत कसं जायचं?
मुंबईत जमावबंदी लावण्यात आली असली, तरीही एवढ्या मोठ्या शहरात नेहमी जमावबंदी असतेच. लोकशाही मार्गाने आम्हाला जो अधिकार दिला आहे, त्या संविधानाच्या मार्गाने आम्ही आमरण उपोषण करण्यासाठी मुंबईला जात आहोत. त्यामुळे, प्रशासनाकडून मुंबईत लावण्यात आलेली जमावबंदी दुसऱ्या कारणासाठी असेल, ती आमच्यासाठीच लावण्यात आल्याचं आम्ही अंगावर घेण्याची गरज नाही. मुंबईत जड वाहनांसाठी बंदी करण्यात आली आहे, मात्र, जर बंदी करायचीच असेल तर सर्वच वाहनांना मुंबईत येण्यापासून बंदी घालण्यात यावी. वाहनांना बंदी घातल्यास आम्ही मुंबईत कसं जायचं असा प्रश्नही,जरांगे यांनी उपस्थित केला आहे.
कुणबी नोंदी मिळालेल्या लोकांना प्रमाणपत्र द्यावे...
राज्यात 54 लाख मराठ्यांचे कुणबी नोंदी आढळून आले आहे. त्या नोंदीच्या आधारे 54 लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात यावे. तसेच त्यांच्या कुटुंबातील लोकांना देखील कुणबी प्रमाणपत्र दिले पाहिजे. तसेच, गणगोत्यातील सगेसोयऱ्यांना जो शब्द ऍड करण्यात आला आहे, त्यानुसार त्यांना देखील कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे,असे जरांगे म्हणाले.
आणखी किती वेळ द्यायचा...
सरकार म्हणत आहे वेळ देत नाही, पण सात महिने वेळ दिला आणखी किती वेळ द्यायला हवा. महाराष्ट्राच्या आंदोलनात आत्तापर्यंत सात महिने कुणी वेळ दिला असेल तर मला दाखवा. ज्या गोष्टी सरकारला माहीत झाल्या त्या लोकांपर्यंत पोहोचायचं त्यांचं काम आहे. त्यामुळे सापडलेल्या 54 लाख नोंदणीची माहिती ग्रामपंचायतवर चिटकवली पाहिजे. ज्यामुळे लोकांना आपली नोंद मिळाली याची माहिती मिळेल,असे जरांगे म्हणाले.
शहरातील लोकांनी आम्हाला एक रस्ता द्यावा...
आम्ही मुंबई बंद पाडण्यासाठी जात नाही. ज्यांना मुंबई बंद पाडायचे आहे त्यांनी मुंबईत यावं, आम्ही मात्र आमच्या मागण्यासाठी मुंबईला जात आहोत. कुणाला त्रास व्हावा यासाठी आम्ही मुंबईत जात नाही. शहरातील लोकांना देखील आमच्या आंदोलनाचा फायदा होणार आहे. शहरातील लोकांना 100 रस्ते आहे त्यातील एक रस्ता आम्हाला दिला तर आम्ही देखील तुमचेच आहोत. कोण म्हणालो आम्ही कायदेशीर लढाई लढतोय, असे जरांगे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी! सरकारचा तीन कलमी प्रस्ताव जरांगे पाटलांनी फेटाळला