Majha Maharashtra Majha Vision | इतिहास अंगात भिनला पाहिजे, पण इतिहासात गुरफटून चालणार नाही : छगन भुजबळ
एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्राबाबतचं त्यांचं व्हिजन स्पष्ट केलं.
मुंबई : 'महाराष्ट्र या शब्दामध्येच महान राष्ट्र असा त्याचा अर्थ आहे. या राज्याला खरोखरच शोर्य, क्रिडा, कला सर्वच बाबतीत महाराष्ट्र देशात अग्रेसर राहिला आहे.' असं छगन भुजबळ म्हणाले. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात ते बोलत होते.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झालं आणि एक नवी आघाडी उदयास आली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं. महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच राज्याला कोरोनाने विळखा घातला. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच आहे. अशातच आता या जीवघेण्या कोरोना व्हायरसमधून महाराष्ट्राला मुक्त करण्यासाठी सरकारचं व्हिजन काय आहे? त्याचबरोबर कोरोना व्हायरसमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या परिणामांचा सरकार कसा सामना करणार आहे? तसेच सरकारला त्यांच्या कार्याची जाण करुन देणाऱ्या विरोधकांची भूमिका काय आहे? हे जाणून घेण्यासाठी एबीपी माझाचा खास उपक्रम माझा महाराष्ट्र माझं व्हिजन हा कार्यक्रम आज होणार आहे. पहिल्या सत्रात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपलं व्हिजन मांडलं आहे.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, 'महाराष्ट्र या शब्दामध्येच महान राष्ट्र असा त्याचा अर्थ आहे. या राज्याला खरोखरच शोर्य, क्रिडा, कला सर्वच बाबतीत महाराष्ट्र देशात अग्रेसर राहिला आहे. परंतु, आपण जर परदेशात गेलो तर तिथल्या गोष्टी पाहून असं वाटतं की, आपण किती मागे आहोत. इतिहासाबाबत सर्वांना प्रेम पाहिजे, त्यासंदर्भात सगळी माहिती पाहिजे, इतिहास अंगात भिनला पाहिजे. पण इतिहासात गुरफटून राहून चालणार नाही आपल्याला.' पुढे बोलताना ते म्हणाले की, 'कधी असं वाटतं की, आपला देश जपान, जर्मनी सारखा का नाही? ज्यांचा इतिहास पाहिला तर, या देशांनी अनेक गोष्टी सहन केल्या. राख रांगोळी होऊनही हे देश उभे राहिले. त्यांच्याकडे अद्ययावत तंत्रज्ञान आहे. तसचं आपलं राज्यही याच देशांप्रमाणे सर्व गोष्टींनी सुसज्ज असायला हवं, असं मला वाटतं.'
'परदेशात मुलांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी सरकार घेतं. आपल्याकडेही मुलांना उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे, नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, शेतकऱ्यांच्या पिकालाही हमीभाव मिळाला पाहिजे.' , असं ते म्हणाले. 'अनेकदा आपल्याकडे शेतातून भाजीपाला येतो पण त्याचं नियोजन नसल्यामुळे तो वाया जातो. परदेशात यावर प्रोसेस करून तो साठवला जातो. परंतु, आपल्याकडे तो वाया जातो. आपण लोकांच्या मुखी का नाही लावू शकत.', असंही ते म्हणाले.
'शिक्षण ही एक गोष्ट आहे, जी आपल्याला सर्वात पुढे घेऊन येऊ शकते. त्यामुळे आपल्या देशात, राज्यात त्या दर्जाचं शिक्षण मुलांना देणं गरजेचं आहे. राज्यातील प्रत्येकाला चांगली घरं मिळाली पाहिजेत. कोविडच्या माध्यमातून आपल्या सर्वांना एक गोष्ट समजलीच असेल की, आपल्याकडील आरोग्य व्यवस्था म्हणावी तेवढी मजबूत नव्हती. लोकांनी स्वतः काही नियम पाळून आपण कोरोनाला हरवण्याचा प्रयत्न करत आहोत. पण हे सर्व पाहताना कुठेतरी असं वाटतं की, माझा महाराष्ट्र प्रत्येक बाबतीत जगात पुढे असला पाहिजे. पण कोविडमुळे तो अडखळतोय. कधी लॉकडाऊन होतोय, तर कधी शिथीलता मिळतेय, लोकांमध्ये अजुनही संभ्रम पाहायला मिळतोय.', असं छगन भुजबळ म्हणाले.
छगन भुजबळ बोलताना म्हणाले की, 'मिशन बिगेन अगेन ज्यावेळी आपण म्हणतो, त्यावेळी आपल्याला पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळच येता कामा नये. जे आहे त्यासोबत आपल्याला पुढे जाणं गरजेचं आहे. कारण आज अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे. मग ती देशाची, राज्याची आणि त्याचबरोबर वैयक्तिकरित्या प्रत्येकाचीच ढासळली आहे. लोकं आत्महत्या करायला लागले आहेत.'
अन्न, वस्त्र, निवाऱ्याव्यतिरिक्तही गरजा आहेत : छगन भुजबळ
छगन भुजबळ बोलताना म्हणाले की, 'आम्ही गहू देणार, तांदूळ देणार, केंद्र सरकारकडून डाळ आली. फक्त एवढ्यावरच भागत नाही. मनुष्य प्राणी असा आहे की, केवळ जेवणं दिलं, कपडा लत्ता दिला एवढ्यावरच आनंदी होत नाही सध्या. अन्न, वस्त्र, निवारा या गरजा खऱ्या, पण सध्या त्या मनुष्याला चांगली गाडी पाहिजे, चांगलं शिक्षण पाहिजे. पण सोयी-सुविधा नसल्यामुळे सध्या ते शक्य होत नाही.'
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, आरोग्य मंत्री राजेश टोपे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि कृषी मंत्री दादाजी भुसे हे नेते महाराष्ट्रासाठीचं त्याचं व्हिजन मांडणार आहेत.
याशिवाय मनोरंजन क्षेत्राचं व्हिजन काय असावं यावर चर्चा करण्यासाठी अभिनेते प्रशांत दामले, दिग्दर्शक महेश मांजरेकर, निर्माते नितीन वैद्य, संगीतकार अतुल गोगावले सहभागी होणार आहेत.
'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' हा कार्यक्रम आज सकाळी दहा वाजल्यापासून एबीपी माझावर पाहता येणार आहे. एबीपी माझाच्या अधिकृत यू-ट्यूब चॅनल, फेसबुक पेजवर नेटीझन्सना हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
Majha Maharashtra Majha Vision 2020 | उद्धव ठाकरे मला टीव्हीवर दिसले, कारभार दिसलाच नाही : राज ठाकरे
कोरोनामुळं उद्योजकांचं मोठं नुकसान, लवकरच विशेष पॅकेजची घोषणा : उद्योगमंत्री सुभाष देसाई
कुटुंबात देखील कुरबुरी होतातच, मात्र सरकारमध्ये अंतर्विरोध नाही : मंत्री बाळासाहेब थोरात