Weather Update: उत्तरेसह दक्षिणेतही जोरदार पाऊस, महाराष्ट्रात काय स्थिती? IMD नं सांगितलं, विदर्भात..
Weather Update: राज्यात मागील दोन दिवसांपासून किमान तापमानाचा पारा कमी झाला आहे.
Weather Update: राज्यात बहुतांश भागात थंडीचा जोर काहीसा कमीच आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे एकीकडे राज्यात पहाटे गारवा आणि धुक्याची चादर दिसून येत आहे. तर दुसरीकडे किमान तापमानात वाढ झाली असून ढगाळ हवामानामुळे हलक्या पावसाची हजेरी राहणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. दरम्यान, सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती पंजाब आणि त्याला जोडून पाकिस्तानच्या परिसरात आहे त्यामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाला पोषक वातावरण आहे. तर दक्षिणेतही जोरदार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याचाच परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होत असून ढगळ हवामान असल्याने राज्यात येत्या 24 तासांत किमान तापमानात 2 अंशांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (IMD forecast)
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पश्चिम हिमालयीन भागात नच्याने पश्चिमी चक्रावात तयार झाला असून पुढील चार दिवस हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, राजस्थान, पंजाब सह महाराष्ट्रात विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात हवामान कोरडे राहणार असून तापमानात काहीशी वाढ होण्याचा अंदाज आहे. (temperature Update)
राज्यात तापमानाचा पारा वाढला
राज्यात मागील दोन दिवसांपासून किमान तापमानाचा पारा कमी झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने चढउतार होत असून अवकाळी पावसाला पोषक हवामान तयार झाल्याने शेतकरी धास्तावले होते. नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. पण पहाटे हलका गारवा आणि धुकंही होतं. राज्यात मध्य महाराष्ट्रात बहुतांश भागात किमान तापमान सामान्य तापमानाच्या तुलनेत अधिक नोंदवले जात आहे. पुणे, नाशिक, मुंबई भागात पारा 16-18 अंशांपर्यंत नोंदवला जात आहे. तर मराठवाड्यात 18-20 अंशांपर्यंत किमान तापमानाची नोंद होत आहे. दरम्यान, आता तापमान येत्या 24 तासांत पुन्हा हळूहळू वाढणार आहे. 2 अंशांनी साधारण तापमानवाढ नोंदवली जाणार असून विदर्भात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी हलक्या सरींची हजेरी लागू शकते.
बुधवारी कसे होते राज्यातील तापमान?
बुधवारी राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा 10 अंशांच्या वर गेला होता. कोकणपट्ट्यात 20 अंशांच्याही पुढे किमान तापमानाची नोंद झाली. रत्नागिरी 21 अंशांवर गेलं होतं तर सिंधुदूर्ग 23 अंशांपर्यंत जाऊन पोहोचलं हेातं. पुण्यात तापामान सामान्य तापामानाच्या तुलनेत चढेच होते. बहुतांश ठिकाणी 16-29 अंशांपर्यंत किमान तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यातही तापमानाचा पारा 16-18 अंशांवर येऊन थांबला होता. उत्तर महाराष्ट्रातही तापमान वाढले होते.