Maharashtra Weather Update: पुढचे 48 तासात अतिमुसळधार पावसाचा अंदाज; राज्यात मान्सूनचा जोर वाढला; पुढील 48 तासांत विदर्भ व्यापणार, कोकणात 'रेड अलर्ट'
Maharashtra Weather Update: मध्य महाराष्ट्रात पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. तर विदर्भातील अनेक जिल्ह्यांत विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई: अनेक दिवस रखडलेला मान्सून अखेर राज्यात सक्रिय झाला आहे. पुढील 48 तासांत मान्सून संपूर्ण विदर्भ व्यापणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. यासोबतच कोकणात अतिमुसळधार पावसाचा (Red Alert), मध्य महाराष्ट्रात मुसळधार (Orange Alert), तर मराठवाडा व विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा (Yellow Alert) इशारा देण्यात आला आहे. कोकणातील रायगड (14 जून) आणि सिंधुदुर्ग (15 जून) येथे अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. तर विदर्भातील अनेक जिल्ह्यांत विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मान्सूनचा प्रवास थांबलेला असतानाही आता तो दक्षिण-पूर्व मध्य प्रदेश ते हरियाणा, तसेच आंध्र किनारपट्टीपासून ओडिशा आणि छत्तीसगड दिशेने पुढे सरकत आहे. या सर्व हवामान स्थितीमुळे मान्सूनला पूरक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळेच मुंबईसह कोकण, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे.पावसामुळे राज्यातील तापमानात लक्षणीय घट झाली आहे.
रेड अलर्ट (अतिमुसळधार पाऊस)
रायगड – 14 जून
सिंधुदुर्ग – 15 जून
ऑरेंज अलर्ट (मुसळधार पाऊस)
मुंबई – 14 जून
ठाणे – 14 जून
रायगड – 13, 15, 16 जून
सिंधुदुर्ग – 13, 14, 16 जून
कोल्हापूर घाटमाथा – 13, 16 जून
सातारा घाटमाथा – 13, 16 जून
सांगली – 13 जून
अकोला, अमरावती – 13 ते 15 जून
चंद्रपूर, गडचिरोली – 13 ते 15 जून
गोंदिया, नागपूर – 13, 14 जून
यलो अलर्ट (वादळी वारे, विजांसह पाऊस)
पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अमरावती, वर्धा, वाशिम, यवतमाळ, भंडारा
पुण्यात काल पावसाचं जोरदार आगमन
गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस अखेर गुरुवारी (12 जून) रात्री पुण्यात जोरदारपणे बरसला. शहरातील मध्यवर्ती भागांपासून उपनगरांपर्यंत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसाने पुणेकरांना अक्षरशः थक्क केले. काही भागांमध्ये मुसळधार सरी बरसल्या, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाने हजेरी लावली. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास डेक्कन, शिवाजीनगर, सिंहगड रस्ता, बाणेर, औंध, बालेवाडी, कोथरूड, स्वारगेट, धनकवडी, कात्रज, हडपसर, कोंढवा, बावधन, पाषाण, बिबवेवाडी आदी भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसामुळे काही वेळ थंड हवामान जाणवले. काही ठिकाणी झाडे कोसळली, वाहतूक कोंडी झाली, अपघाताचे प्रकार घडले आणि वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. विशेषतः कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांना रस्त्यांवरील ट्रॅफिकमुळे त्रास सहन करावा लागला.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड परिसरातही पावसाने तुफान हजेरी लावली. थेरगाव, पिंपळे सौदागर, चिंचवड, आकुर्डी, निगडी, भोसरी अशा भागांत जोरदार सरी कोसळल्या. काही भागांत पावसाचा जोर इतका होता की काही मिनिटांत रस्त्यांवर पाणी साचले.पुणे शहरात काल रात्री झालेल्या पावसामुळे शहरातील विविध भागात 20 झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. नवले पुलानजीक एक जेष्ठ महिला नाल्यामध्ये वाहून गेल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाकडून शोधकार्य सुरु आहे. आज सकाळपासून पुण्यात ढगाळ वातावरण आहे. हवामान खात्याने पुण्याला पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.






















