चक्रीवादळ अन् परतीच्या पावसाचा प्रभाव! लातूर धरशिवसह कोकण, मध्य महाराष्ट्रात दोन दिवस मुसळधार पावसाचे अलर्ट
पुढील चार-पाच दिवसांत कमाल तापमानात किंचित वाढ होईल, तर किमान तापमानात फारसा बदल होणार नाही, असंही हवामान खात्याने म्हटलं आहे.

Weather Update: राज्यात पुन्हा एकदा हवामानात बदल होत असून, अरबी समुद्रातील ‘शक्ती’ या तीव्र चक्रीवादळाचा परिणाम आणि परतीच्या मान्सूनमधील बदल यांचा संयुक्त प्रभाव दिसू लागला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (IMD Forecast)
मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्रानुसार, मराठवाड्यात 7 ते 11 ऑक्टोबरदरम्यान तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यांत 7 ऑक्टोबरला तर लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत 8 व 9 ऑक्टोबरला मेघगर्जना व वादळी वाऱ्यासह पाऊस पडू शकतो. या काळात वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किमीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, मराठवाड्यात पुढील चार-पाच दिवसांत कमाल तापमानात किंचित वाढ होईल, तर किमान तापमानात फारसा बदल होणार नाही, असंही हवामान खात्याने म्हटलं आहे.
Shakti Cyclone: चक्रीवादळाची तीव्रता कमी होणार
‘शक्ती’ चक्रीवादळाने 6 ऑक्टोबरच्या संध्याकाळी पश्चिम-मध्य आणि वायव्य अरबी समुद्रावर वेग घेतला. हे वादळ सध्या मसिरा (ओमान) पासून सुमारे 180 किमी आग्नेयेस, कराचीपासून 930 किमी नैऋत्येस आणि द्वारकापासून 970 किमी पश्चिम-नैऋत्येस स्थित आहे. पुढील काही तासांत त्याची तीव्रता कमी होत कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होईल, अशी शक्यता आहे. मात्र, वादळी वाऱ्यांच्या दिशेत झालेल्या बदलामुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, पुढील 48 तासांत राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस होऊ शकतो.
यलो अलर्ट : मराठवाडा, उत्तर कोकण, उत्तर व पूर्व विदर्भ
मुसळधार पावसाची शक्यता : ठाणे, पालघर, कोकण किनारपट्टी आणि पूर्व विदर्भातील काही जिल्हे

7 ऑक्टोबर रोजी पालघर, ठाणे, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे नंदुरबार, जळगाव, संभाजीनगर, जालना, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात यलो अलर्ट आहे. तर बहुतांश मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्यात हल्या पावसाचा अंदाज आहे
८ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट आहे. उर्वरित ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता
९ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूरमध्ये यलो अलर्ट
१० ऑक्टोबर रोजी कोल्हापूर सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर नंतर पाऊस ओसरणार आहे.
काढणीला आलेलं सोयाबीन काढा, कृषी विद्यापीठाचा सल्ला
दरम्यान, प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने शेतकऱ्यांना काही शिफारसी केल्या आहेत. त्यानुसार, काढणीस तयार असलेल्या सोयाबीन पिकची काढणी लवकरात लवकर करावी व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी केलेले सोयाबीन पिक वाळल्यानंतर मळणी करावी. तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता, पिकात, फळबागेत, भाजीपाला व फुल पिकात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.


















