Maharashtra Weather Report : अवकाळीचं संकट कायम! मराठवाडा, विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी; शेतकरी संकटात
Maharashtra Weather Report : काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि हलक्या स्वरूपात गारा पडण्याचा इशारा आयएमडीने दिला आहे, त्यानुसार अनेक ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.
मुंबई : देशाच्या हवामानात (Weather Update) गेल्या काही दिवसांपासून मोठा बदल पाहायला मिळत आहे. कुठे उष्णतेच्या झळा (Heat Wave) बसत आहेत, तर कुठे मुसळधार पावसाने (Unseasonal Rain) झोडपून काढलं आहे. आजही हवामान विभागाने राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार, अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. काही जिल्ह्यांमध्ये सोमवारी रात्रीपासूनच पावसाची रिमझिम सुरु आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजनुसार, पुढील 24 तासांत विविध भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
बुलढाणा जिल्ह्यात जोरदार पाऊस
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, बुलढाणा जिल्ह्यात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. खामगाव आणि शेगाव परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह पहाटेपासूनच जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. शेगाव परिसरात अनेक घराचं नुकसान झालं आहे. दरम्यान, महायुतीच्या प्राचार सभेवर पावसाचं सावट आहे. आज सायंकाळी सहा वाजता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खामगाव येथे प्रचार सभा होणार आहे. यावर पावसाचं संकट आहे.
हलक्या स्वरूपाच्या गारासह विजेच्या कडकडासह वादळी पाऊस
23 April, Convective clouds over parts of Chandrapur, Gadchiroli & around in Vidarbha. Watch for Thunder possibility during next 2 hrs.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 23, 2024
Also some development possible over parts of Ch Sambaji Ngr, Jalana Parbhani Hingoli around during next 3, 4 hrs.
Watch for IMD Updates pic.twitter.com/bVyi68cZMF
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकरी संकटात
अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातल्या वाडेगाव आणि हिंगणा गावाला अवकाळी पावसाने चांगलंच झोडपलं आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिट झाल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. आधीच अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेला शेतकरी पुन्हा एकदा आजच्या पावसाने हतबल झालाय. दरम्यान, हवामान विभागाने अकोल्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा अंदाज दिला होता, त्यानुसार आज अकोला जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. वाढत्या तापमानात आजचा पाऊस अकोलेकरांना काहीसा दिलासादायक ठरणार आहे.
वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना दिलासा
मागील चार दिवसांपासून प्रखर उन्हाचे चटके बसत असताना आज सकाळपासून भंडारा जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. त्यातच सकाळपासून भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. विजांच्या कडकडाटासह काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसला आहे. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांची उकाड्यापासून काही प्रमाणात सुटका झाली आहे. भारतीय हवामान विभागाने, भंडारा जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तविली असून नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी, असा सतर्कतेचा इशारा दिला आहे.