Maharashtra Weather : महाराष्ट्रात 7 ते 11 मे दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, पंजाबराव डख यांचा अंदाज
Maharashtra Weather Forecast : राज्यामध्ये 6 मेपर्यंत हवामानं कोरडं वातावरण राहणार आहे. 7 मे ते 11 मे दरम्यान राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) 7 ते 11 मे दरम्यान मुसळधार अवकाळी पावसाचा अंदाज (Unseasonal Rain) हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी व्यक्त केला आहे. राज्यात सध्या कुठे ऊन, तर कुठे पाऊस अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये उन्हाचा तडाखा वाढला आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao dakh) यांनी येत्या आठवड्यात हवामान कसं असेल याचा अंदाज वर्तवला आहे.
महाराष्ट्रात 6 मेपर्यंत हवामान कोरडं
राज्यामध्ये 6 मेपर्यंत हवामान कोरडं वातावरण राहणार आहे. 6 मेपर्यंत राज्यात तापमानाचा पारा वाढताच राहणा आहे. त्यानंतर 7 मे ते 11 मे दरम्यान राज्यात पावसाची शक्यता आहे. 7 ते 11 मे दरम्यान राज्यात वादळी वाऱ्यासह, विजेच्या गडगडाटासह गार अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार, तर काही ठिकाणी गारपीट होणार असल्याचाही अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.
7 मे ते 11 मे दरम्यान जोरदार अवकाळी पावसाची शक्यता
पूर्व विदर्भात 7 ते 11 मे दरम्यान, विजांचा गडगडाटासह वादळी पाऊस पाहायला मिळणार आहे. 7 मेच्या आधी हळद, कांदा काढून झाकून ठेवा, कारण त्यानंतर जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातही 7 मेपासून पुढील पाच दिवस जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी 6 मेपर्यंत कांदा, कापूस, हळद पिकांची काढणी करुन ते नीट झाकून ठेवा, असा सावधगिरीचा इशारा पंजाबराव डख यांनी दिला आहे.
वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊसाचा अंदाज
पश्चिम महाराष्ट्रातही हे पाच दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, हा पाऊस ऊसाच्या पिकासाठी फायदेशीर असणार आहे. यासोबतच कोकणातही 7 मेपासून पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत उन्हाळ्यात झालेल्या पावसापेक्षा 7 ते 11 मे दरम्यान जोरदार अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.
मुंबईत देखील पावसाची शक्यता
उत्तर महाराष्ट्रात 8 ते 11 मे दरम्यान अवकाळी पावसाचं थैमान पाहायला मिळेल. मुंबईत देखील पावसाची शक्यता आहे. नाशिक, पुण्यातही पावसाची शक्यता आहे. 7 ते 11 मे दरम्यान महाराष्ट्रात विविध भागात पावसाची शक्यता आहे. देशात आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू या भागात मान्सूनप्रमाणे अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळेल, असंही पंजाबराव डख यांनी सांगितलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :