Monsoon : यंदाचा मान्सून कसा असेल? काही राज्यांमध्ये कमी पावसाची शक्यता; स्कायमेटचा अंदाज वाचा सविस्तर...
Skymet Weather Forecast : यंदा समाधानकारक मान्सून पाहायला मिळेल. यंदा पावसाळ्यात पर्जन्यमान चांगलं राहणार आहे, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.
मुंबई : मान्सूनची (Monsoon) आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदा मान्सूनमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता, त्यामुळे अनेक भागात सध्या पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक भागात पाण्याची समस्या आहे. मात्र, यंदाच्या मान्सूनमध्ये यापासून दिलासा मिळणार आहे. कारण, यंदा मान्सूनमध्ये चांगला आणि सरासरीप्रमाणे सामान्य पाऊस होण्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.
कसा असेल यंदाचा मान्सून?
स्कायमेट वेदर (Skymet Weather) या हवामानाचा अंदाज देणाऱ्या संस्थेच्या अहवालानुसार, यंदा समाधानकारक मान्सून पाहायला मिळेल. यंदा पावसाळ्यात पर्जन्यमान चांगलं राहणार आहे. नेहमीच्या सरासरी च्या 102 टक्के म्हणजे सर्वसाधारण पाऊस पडेल, असा स्कायमेट वेदरने वर्तवला आहे. एल निनोचं (El Nino) ला निनो (La Nina) मध्ये रुपांतर होत असल्याने महाराष्ट्राच्या अवर्षणग्रस्त भागातही चांगल्या पावसाचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.
ला निनोमुळे चांगल्या पावसाची शक्यता
गेल्या वर्षी 2023 मध्ये कमकुवत मान्सून पाहायला मिळाला मात्र, यंदा मान्सून सामान्य राहण्याची शक्यता आहे. जगभरातील हवामानावर परिणाम करणारा एल निनो कमजोर होऊ लागला आहे. जून ते ऑगस्ट या कालावधीत ला निना परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे यंदाचा मान्सूनचा पाऊस गेल्या वर्षीपेक्षा चांगला असू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Skymet, India’s leading weather forecasting and agriculture risk solution company has released its monsoon forecast for 2024.
— Skymet (@SkymetWeather) April 9, 2024
Click on the link to know more:https://t.co/0FfeAlPBJp#Skymet #Rain #ElNino #LaNina #Temperature #Forecast #Monsoon2024 #WeatherUpdate #ClimateChange
यंदा मान्सून वेळेवर दाखल होणार
स्कायमेटच्या अंदाजानुसार, जून महिन्यापर्यंत अल निनोचं ला निनामध्ये रूपांतर होईल. यामुळे मान्सून वेळेवर दाखल होऊन चांगला होईल, अशी शक्यता आहे. विषुववृत्तीय प्रशांत महासागरात उच्च तापमान कायम राहिल्यास तीव्र चक्रीवादळे आणि अतिवृष्टी देखील होण्याची शक्यता आहे. एल निनोची स्थिती संपल्यानंतरही, जागतिक तापमानातील विसंगती कायम राहण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे उष्णतेची तीव्रता कायम राहू शकते.
सरासरी 96-104 टक्के पावसाचा अंदाज
स्कायमेट संस्थेने, यंदाचा मान्सूनचा अंदाज जाहीर केला आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार, 2024 मध्ये भारतात मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज आहे. आगामी मान्सूनमध्ये 102 टक्के सामान्य पर्जन्यमान असेल. यंदा मान्सून कालावधीच्या सरासरी 96-104 टक्के असण्याचा अंदाज आहे. याआधीही स्कायमेटने जारी केलेल्या पहिल्या अंदाजात 2024 मध्ये मान्सून सामान्य राहणार असल्याचे संकेत दिले होते. यानंतरही ते संकेत कायम आहेत.