सूरतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार, कोल्हापुरात उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिरं (Temples of Chhatrapati Shivaji Maharaj) उभा करु. तसेच सुरतमध्येही छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
Uddhav Thackeray : छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याच्या कामात तुम्ही भ्रष्टाचार केला आहे. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी घाईघाईने पुतळा उभारुन महाराजांचा अवमान केला असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर केली. आम्ही केवळ पुतळे उभा करणार नाही तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिरं (Temples of Chhatrapati Shivaji Maharaj) उभा करु असेही ठाकरे म्हणाले. तसेच महाराष्ट्रातच नाहीतर सुरतमध्येही छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारणार असल्याचेही ठाकरे म्हणाले.
इंग्रजांना विरोध करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती. त्याच सुरतेमध्ये महाराष्ट्राच्या पाठीत वार करुन तुम्ही गद्दार घेऊन गेला होता. त्याच सुरतमध्ये शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. 50 खोके घेऊन तुम्ही महाराष्ट्र विकत घेऊ शकत नाही. तुमचे कितीही जन्म गेले तरी माझा महाराष्ट्र तुमच्या खोक्यात मावू शकणार नाही असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणारच
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणारच असा विश्वास देखील उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. आताची लढाई महाराष्ट्र प्रेमी विरुद्ध महाराष्ट्र द्रोही अशी आहे. आज मी साथ मागायला आलो आहे. तुम्ही माझ्यासोबत लढायला तयार आहात का? असा सवाल देखील ठाकरेंनी उपस्थित केला. प्रचाराचा शुभारंभ आई अंबाबाईचे दर्शन घेऊन, बाळूमामा यांचं दर्शन घेऊन, तुमचे दर्शन करतोय असेही ठाकरे म्हणाले. राधानगरीची जनता गद्दाराला गाडल्याशिवाय राहणार नाही. मी उमेदवारी दिली, मान सन्मान दिला, प्रेम दिले.सगळं देऊन शिवसेना सारख्या आईवर वार कसा काय करु शकतो असे म्हणत शिवसेना सोडलेल्यांवर ठाकरेंनी जोरदार टीका केली. सतेज पाटील आमच्यासोबत आहेत हे मला आणखी बरं वाटलं. इथल्या विजयाची जबाबदारी सतेज पाटील यांच्यावर टाकतो. शाहू महाराज आहेत, सतेज पाटील आहेत, असं वातावरण असलं की मन भरून येते असेही सतेज पाटील म्हणाले.
देवा भाऊ दाढी भाऊ, तिसरीकडे जॅकेट भाऊ, उद्धव ठाकरेंची टीका
आज तीन तीन भाऊ आले आहेत. एका बाजूला देवा भाऊ दुसरीकडे दाढी भाऊ, तिसरीकडे जॅकेट भाऊ. भाऊ भाऊ आणि मिळून खाऊ असे हे आहेत अशी टीका उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर केली आहे. मुलींप्रमाणे मुलांना देखील उच्च शिक्षण मोफत शिक्षण देणार आहे. महिलांची पोलीस भरती करणार, इतकंच नाही तर स्वतंत्र महिलांची पोलीस स्टेशन उभा करणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. धारावीत परवडेल अशा दरात घर मिळेल अशी व्यवस्था आम्ही करणार आहोत. शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव देणार. सरकार पडलं नसतं तर यावर्षी देखील कर्ज मुक्त केलं असतं असेही उद्धव ठाकरे म्हणाले.