(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दिवाळीत ST सुसाट सुटणार, संप न करण्याचा निर्णय; उदय सामंतांची गुणरत्न सदावर्तेंशी चर्चा, नेमकं काय ठरलं?
ST Bus: सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यामुळे आम्ही तूर्तास एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित करत आहोत, असे सदावर्ते म्हणाले.
मुंबई : दिवाळीत (Diwali 2023) एसटी प्रवास (ST Mahamandal) अडथळ्याशिवाय सुसाट धावणार आहे. सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी दिलेल्या एसटी बंदच्या संप मागे घेण्यात आला आहे. मंत्री उदय सामंतांसोबत सकारात्मक चर्चा झाली. एसटी कर्मचाऱ्यांबाबत बैठकीत महत्वाच्या चार मुद्द्यांवर चर्चा झाली. मंत्री उदय सामंत यांनी बैठकीनंतर ही माहिती दिली आहे. दिवाळीनंतर मुख्यमंत्र्यांसोबतच यासंदर्भात बैठकीचं आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकीतील निर्णयाची माहिती मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी पत्रकार परिषद घेत दिली आहे.
उदय सामंत म्हणाले, एसटीच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याने एसटी कष्टकरी जनसंघाकडून आंदोलन मागे घेण्याचा निर्णय झाला आहे. सदावर्ते हे कष्टकरी जनसंघाचे पदाधिकारी आहेत. एसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असेल त्यांना मदत करणं ही आमची भूमिका आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे, दिवाळीनंतर मुख्यमंत्र्यांसोबतच यासंदर्भात बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे.
बैठकीत घेण्यात आलेले निर्णय
- दिवाळीनंतर मुख्यमंत्र्यांसोबतच यासंदर्भात बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे
- पुरुष, महिलांवर अन्याय होत असेल तर संबंधित अधिकाऱ्याकडे दाद मागू शकतात असं पत्रक काढण्याचा निर्णय झाला
- बोनस वाढला पाहिजे, यासंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील आणि जाहीर करतील
- आजपासूनचं आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
- 2 हजार 200 नवीन गाड्या येणार
- 2025-26 ला 2500 बस येणार
- येत्या चार वर्षात एसटीत नऊ हजार बसेस दाखल होतील
- दोन वर्षात अडीच हजार ईव्ही गाड्या दाखल होतील
सदावर्तेंचे मराठा आरक्षणावरील निर्णय आम्हाला मान्य नाही : सामंत
उदय सामंत म्हणाले, सदावर्तेंबरोबर एसटीसंदर्भात चर्चा झाली याचा अर्थ हा नाही की आरक्षणावर त्यांचे विचार आम्हाला मान्य आहे. आमचे सदावर्ते यांच्याबरोबर मतभेद कायम असतील. मराठा आरक्षण आम्हाला द्यायचं आहे. कुठेही फूट पडेल असं आम्हाला वाटत नाही. कुणबी प्रमाणपत्र मिळाले तसे आमेही प्रयत्न करत आहे. प्रत्येकाची भूमिका वेगवेगळी असली तरी आम्हाला मराठ्यांना टिकणारे आरक्षण द्यायचं आहे.
विलीनीकरणासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत पंधरा दिवसात चर्चा करणार : सदावर्ते
सातवा वेतन आयोग, एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत पंधरा दिवसात चर्चा होणार आहे. त्यामुळे सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यामुळे आम्ही तूर्तास एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित करत आहोत.
हे ही वाचा :